लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या आडत बाजारात दिवाळीपासून सोयाबीनची आवक दोन पटीने घटली आहे. असे असले तरी सोयाबीनच्या दरात मात्र वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसात सोयाबीनच्या दरात ५० रूपयांची वाढ झाली असून आडत बाजारात गुरूवारी सोयाबीनला ४ हजार ७५१ रूपये सर्वाधिक दर मिळाला आहे. सोयाबीनच्या दराची ५ हजार रूपयांकडे वाटचाल सुरू असून शेतक-यांचेही त्याकडे लक्ष लागले आहे.
लातूर जिल्हयात ५ लाख ९१ हजार ६६५ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला होता. या मध्ये ४ लाख ८७ हजार ६६३ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला होता. सध्या सोयाबीन पिकांची काढणी व मळणी सुरू आहे. मळणी झालेल्या सोयाबीनची लातूरच्या आडत बाजारात आवक सुरू झाली आहे. लातूरच्या आडत बाजारात दि. २५ ऑक्टोबर रोजी ५१ हजार ८८४ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ४ हजार ३५० रूपये दर मिळाला. २८ ऑक्टोबर रोजी ४८ हजार १७० क्विंटल सोयाबीनची आवक होऊन ४ हजार ५०० रूपये सर्वाधिक दर मिळाला. शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी २५ हजार ९१२ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ४ हजार ५६० रूपये दर मिळाला आहे. सोमवार दि. ३ नोव्हेंबर रोजी १९ हजार ४१० क्विंटल सोयाबीनची आवक होऊन ४ हजार ७०१ रूपये दर मिळाला. तर दि. ६ नोव्हेंबर रोजी १५ हजार ८७० क्विंटल सोयाबीनची आवक होऊन ४ हजार ७५१ रूपये या वर्षीचा सर्वाधिक दर मिळाला आहे.
लातूरच्या आडत बाजारात गेल्या १५ दिवसात सोयाबीनची आवक दोन पटीने घटली असली तरी दरामध्ये मात्र ४५० रूपयांनी वाढ झालीआहे. या हंगामामध्ये सोयाबीनला ५ हजार रूपयांच्या वर दर मिळतो का याकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे.

