नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्वच पक्षांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते आश्वासनांची खैरात करीत आहेत. आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
राज्यात सोयाबीनच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील शेतक-यांच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ७ हजार हमीभाव आणि बोनस दिला जाईल, असे जाहीर केले. तसेच कांद्याचा हमीभाव निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन करणार आणि कापसालादेखील योग्य हमीभाव देणार, असे आश्वासन दिले.
राज्य विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रचारात झोकून दिले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होत असून, दोन्ही आघाड्यांकडून सत्ता आल्यास काय करणार, याबद्दल मोठ-मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. या अगोदर महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यात ब-याच घोषणा केल्या आहेत. यासोबतच आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून तीन मोठ्या घोषणा केल्या.
विधानसभा निवडणुकीत राज्यात वेगवेगळ््या भागात शेतमालाला हमीभावाची मागणी करणारा मुद्दा ऐरणीवर आला. मराठवाडा, विदर्भात सोयीबीनल चांगला भाव मिळत नसल्याने शेतक-यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलेल्या घोषणेला विशेष महत्त्व आहे.
लोकसभा निवडणुकीत कांद्याचा मुद्दा जास्त गाजला होता. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसल्याचे दिसले. आता विधानसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघात सोयाबीन किमतीचा मुद्दा कळीचा बनला. सोयाबीनची कमी किमतीने खरेदी होत असल्याने शेतक-यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.
महाविकास आघाडी देणार शेतक-यांना मेहनतीचे फळ
मागील तीन निवडणुकांपासून भाजप सोयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव देण्याचे वचन देत आहे. पण आजही शेतकरी रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या सोयाबीनला ३ ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे. महाविकास आघाडी अन्नदात्यांना त्यांचा हक्क, मेहनतीचे फळ आणि न्याय देईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.