36.5 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रसोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव; १२ कावळे, २ घार, १ बगळा मृत्युमुखी

सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव; १२ कावळे, २ घार, १ बगळा मृत्युमुखी

सोलापूर-सोलापूर शहरात विविध ठिकाणी बारा कावळे, दोन पार व एक बगळा मृत्युमुखी पडल्याची घटना पडली. दरम्यान, याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून एच ५ एन १ बर्ड फ्लूमुळे त्या पक्षांचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य प्रशासन सर्वच पातळीवर सज्ज झाले आहे. या पक्षांच्या आजाराची लोकांना लागण होऊ शकणार नाही मात्र नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. यामुळे शहरातील विविध तीन ठिकाणे २१ दिवस प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

पार्क चौपाटी नजीक असलेल्या किला खंदकबाग, श्री सिद्धेश्वर तलाव परिसर आणि धर्मवीर संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव) या तिन्ही ठिकाणी जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. विशाल येवले, सहाय्यक आयुक्त डॉ. भास्कर दराडे आणि महापालिकेचे पशु शल्य चिकित्सक डॉ. सतीश चौगुले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
सोलापूर शहरातील धर्मवीर संभाजी महाराज तलाव या ठिकाणी बारा कावळे मृत्युमुखी पडल्याचे वन विभागाने पशुवैद्यकीय चिकित्सालय विभागाला कळविले. ९ मार्च रोजी ही घटना घडली. १२ मृत कावळे वन विभागाने पशु चिकित्सालयात जमा केले होते.

तसेच दोन घार व एक बगळा पक्षीही अचानक मृत्युमुखी पडले होते. तत्पूर्वी सहा मृत कावळे ९ मा र्चपूर्वी जमा करण्यात आले होते. त्यांचे शवविच्छेदन केले. त्यावरून हिट स्ट्रोक मुळे किंवा विषबाधेमुळे मृत्यू झाला असेल असा प्राथमिक अहवाल जिल्हा आयुक्तांना पाठवला होता. त्यानंतर ९ मार्चला मृत पक्षांचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले.
नुकताच भोपाळ येथील हाय सिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसीज प्रयोगशाळेतून त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. जवळपास ३४ नमुने तपासणीसाठी पाठविले होते. सर्व नमुने एच५ एन १ या व्हायरसने पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय विभागाचे उपायुक्तांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना ही माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटिफिकेशन काढले, सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती डॉ. भास्कर पराडे यांनी दिली. वन्य पक्षांमध्ये बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे पण घरगुती कोंबड्या, बदके किंवा इतर पक्षी यांना कोणताही आजार अथवा लागण झाल्याचे निदर्शनास आले नाही. कुकुटपालन केंद्र येथेही एक ही मृत्यू आढळला नाही.

घरगुती पक्षाचे सुमारे ५० नमुने संकलित केले. ते पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. येथे चार दिवसात त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. जर घरगुती पक्षात बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळला तर ० ते १ किलोमीटर परिसर प्रतिबंधित करण्यात येणार आहे. दरम्यान, शास्त्रीय पद्धतीने मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे. प्राथमिक खबरदारी घेतली जात आहे. संबंधित तिन्ही ठिकाणी स्वच्छता आणि औषध फवारणी केली जात आहे.

नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. शंभर वर्षांमध्ये पक्षापासून मानवास आजार झाल्याचे अद्यापही आढळून आलेले नाही. तरीही नागरिकांनी अंडी आणि कोंबडीचे मांस उकळून खावे, उकळलेल्या पाण्यात १०० अंश सेल्सिअस तापमान असते. त्यात कुठलाही व्हायरस जंतू जिवंत राहत नाही. त्यामुळे कोणताही धोका मानवी जीवास नाही. दुकानदारांनी कोंबड्यात आजार आढाळल्यास माहिती द्यावी. दुकानदारांचाही सर्व्हे केला असता अद्याप कोंबड्यांचा आजार आढळला नाही. नागरिकांनी घाबरू नये मात्र दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयसोलापूरचे सहाय्यक आयुक्त डॉ. भास्कर पराडे यांनी केले आहे.

वन्य पक्षांना बाधित झालेला हा बर्ड फ्लू आजार माणसांमध्ये जाऊ शकत नाही, संबंधित तीन ठिकाणचा परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहे. सध्या अलर्ट झोन मध्ये आहे. चार दिवसात पुणे येथील प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होईल. जर घरगुती कोंबड्यात आजार आढळला तर पुढील नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. अ‍ॅक्शन प्लॅन नुसार सर्व दक्षता घेण्यात येत आहे. कुठे मृत पक्षी आढळल्यास नागरिकांनी पशु शल्य चिकित्सालय विभाग, वन विभाग आणि महापालिका प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. विशाल येवले यांनी केले आहे.

सोलापूर शहरातील किला खंदकबाग, श्री सिद्धेश्वर तलाव येथील गणेश घाट परिसर, विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी महाराज तलाव बोटिंगचा परिसर आदी तीन ठिकाणी महापालिका आरोग्प प्रशासनाकडून औषध फवारणी करण्यात आली आहे. या भागात २ टक्के सोडियम हायपोक्लोरेट, दोन टक्के पोटॅशियम परमॅग्नेट या द्रावणाची फवारणी फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केला आहे, महापालिकासह विविध संबंधित प्रशासकीय विभाग सर्व पातळीवर सज्ज आहे. सर्व परिसर परिसराची स्वच्छता केली, अशी माहिती महापालिकेचे पशु शल्य चिकित्सक डॉ. सतीश चौगुले यांनी दिली.

पार्क चौपाटी नजीक असलेल्या किला खंदकबाग, श्री सिद्धेश्वर तलाव परिसर आणि धर्मवीर संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव) हे तिन्ही परिसर अलर्ट झोन महणून जाहीर केले आहेत, लोकांना येण्यास प्रतिबंध केला आहे. २१ दिवस हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. लोकांनी घाबरू नये.

वन्य पक्षांच्या आजाराची लागण मनुष्यास होत नाही. लोकांनी घाबरून न जाता आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे पशु शल्य चिकित्सक डॉ. सतीश चौगुले यांनी केले आहे.दरम्यान विविध प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी खंदक बाग परिसराची पाहणी केली. यावेळी खंदक बागेत तीन आणि पार्क चौपाटी परिसरात एक कावळा मृत आढळून आला. पार्क चौपाटी परिसरात मृत कावळ्याच्या शेजारीच चायनीज गाड्यांवर पदार्थ बनविण्याचे काम सुरू होते. वर्दळही तशीच होती. मृत कावळा उचलण्याची कार्यवाही झाली नव्हती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR