सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ कंटेनर, मिनीबस आणि दुचाकीच्या विचित्र तिहेरी अपघातात दुचाकीस्वारासह बसचालक आणि बसमधील महिला अशा तिघा जणांचा मृत्यू झाला. तर अन्य १५ प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जागेवर न थांबता कंटेनरचालकाने पलायन केले असून, त्याच्याविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दयानंद भोसले (वय ३४, रा. लांबोटी, ता. मोहोळ) यांच्यासह बसचालक लक्ष्मण पवार आणि बसमधील प्रवासी महिला सपना मोहिते (४०, रा. कुसगाव, ता. भोर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुसगाव येथील १६ महिला मुलाबाळांसह मिनीबसमध्ये बसून अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूरच्या देवदर्शनासाठी आल्या होत्या. तुळजापूर आणि अक्कलकोटचे देवदर्शन आटोपून या सर्वजणी सोलापूर-पुणे महामार्गावरून पंढरपूरच्या दिशेने जात होत्या.
वाटेत मोहोळ तालुक्यातील कोळेगाव पाटीजवळ एका दुचाकीस्वाराला समोरून भरधाव वेगाने येणा-या कंटेनरने धडक दिली आणि त्या पाठोपाठ पुढील मिनीबसला मध्यभागी जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दयानंद सदा भोसले (३४, रा. लांबोटी, ता. मोहोळ) याच्यासह बसचालक लक्ष्मण बासू पवार आणि बसमधील प्रवासी महिला सपना रमेश मोहिते (४०, रा. कुसगाव, ता. भोर) या तिघांचा मृत्यू झाला.