सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यापासून मागील कोलमडलेले नियोजन आता पूर्वपदावर येत आहे. नियोजन केल्याने आवक आटोक्यात आली, मात्र, दरातील घसरण सुरूच राहिली आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक आपला माल कर्नाटकातील कलबुर्गी आणि बंगळुरूला घेऊन जात आहेत. सोलापुरात २००० रुपयात विकला जाणारा कांदा बंगळुरूमध्ये २८०० रुपयांना विकला जातो. खर्च जाऊन सोलापूरपेक्षा ५०० रुपये दर जास्त मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांचा कल बंगळुरूकडे अधिक वाढत चालला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणे बंगळुरू बाजारही कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. मागील आठ दिवसांपासून सोलापूर बाजार समितीत आवक वाढल्याने नियोजन गडगडले होते.सोमवारपासून कांदा मार्केट सुरळीतपणे सुरू आहे. गाड्या थांबण्यासाठी बाजारात सोय करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक गेटवर कर्मचारी नेमण्यात आले आहेत. असेबाजार समिती प्र. सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी सांगीतले.
बंगळुरूला माल घेऊन जाण्यासाठी एका पिशवीला १९५ रुपये घेतात. तोच खर्च सोलापूरला घेऊन जाण्यासाठी ३० रुपये आहे. मात्र, सोलापुरात चांगल्या मालाला दर मिळतो, मात्र, गोलटी, फकड़ी कांद्याला २०० ते ३०० रुपयांचा दर मिळतो, मात्र, बंगळुरूमध्ये साधारण मालालाही कमीत कमी १४०० रुपयांचा दर मिळतो. त्यामुळे साढ़ेचार एकरातील कांदा बंगळुरूलाच पाठवत आहे. असे गावडी दारफळचे शेतकरी नागेश पवार म्हणाले.
बंगळुरू मार्केटमध्ये सकाळी ९ वाजता लिलाव झाल्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत बोलावून पट्टी देतात. तसेच राहण्यासाठी रयत भवनात नियोजन करतात. जेवणासाठी कुपन देतात आणि सोलापूरला येण्यासाठी व्यापारी स्वतः रेल्वेचे तिकीट काढून देतात. जर शेतकऱ्यांना काहीही समजत नसेल, तर त्यांना सोडण्यासाठी हमाल रेल्वे स्थानकापर्यंत येतात. त्यामुळे मागील १२ वर्षापासून बंगळुरूलाच कांदा विक्रीसाठी पाठवतो, असे गावही दारफळचे शेतकरी नागेश पवार यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकरी आता इतर बाजार समित्यांकडे कांदा घेऊन जात आहेत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी कलबुर्गीला जात आहेत तर बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्यांतील अनेक गावांतील शेतकरी टक भरून बंगळुरुला जात आहेत. गावडीदारफळ, वडाळा, पडसाळी, शेळगाव आर, केमवाडी या भागातील शेतकरी दरवर्षी बंगळुरूला जात आहेत.