सोलापूर : उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढतात, मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. सोलापूर बाजारात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक सुरळीत असून दर मात्र स्थिर आहेत. फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची, भोपळा, कारले, दोडका, गिलके, बटाटा या भाज्यांचे दर किरकोळ चढ-उतार होत आहेत. तर ग्राहकाकडून वांग्याला मागणी कमी असल्याने वांग्याचे भरीत झाल्याची स्थिती आहे. मात्र, मागील आठवड्याच्या तुलनेत दरामध्ये मोठा फरक नाही त्यामुळे ग्राहकांना दिलासा आहे.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वांग्यांची स्थानिक भागातून मागील तीन दिवसामध्ये ३५ ते ५० क्विंटल आवक झाली. वांग्यांना किमान ३०० रुपये, सरासरी १००० रुपये, सर्वाधिक १५०० रुपये दर मिळत आहे.
कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवले गेले आहे. १ एप्रिल २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. निर्यातशुल्क हटविल्याने आता भाव चांगला मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.पालेभाज्यांमध्ये मेथी, शेपू, पालक, चुका यांचे दरही स्थिर आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात सामान्यतः भाज्यांचे दर वाढतात, काही भाज्या बाजारातून गायबही होतात. मात्र, यंदा मार्च महिन्यातही दर नियंत्रणात असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले. भाजीपाल्याचे सध्या दर नियंत्रणात असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना फायदा होत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत भाज्यांची कमतरता जाणवत असते, मात्र यंदा नियमित आवकेमुळे बाजारात विविध भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये भाजीपाल्याला आतापेक्षा दुप्पट ते अडीचपट दर होता. या वेळी अधिक उत्पादन असल्यामुळे दरात फारशी वाढ झालेली नाही, असे विक्रेते सांगत आहेत.