लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांचे दिवसा विजेचे स्वप्न पुर्णत्चास नेण्यासाठी महावितरण कंपनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी जलदगतीने कामाला लागली आहे. मात्र अद्यापही गेल्या अनेक महिन्यांपासून कोटेशन देवूनही कुसूम-ब योजनेतील अर्जदार शेतकरी आपला लाभर्थी हिस्सा भरत नसल्याचे आढळून आले आहे. लातूर परिमंडळातील ३९ हजार ६३४ शेतक-यांना महावितरणने कोटेशन पाठवले आहेत. दोन महिन्याच्यावर कालावधी ओलांडला तरीही लाभार्थी रक्कम भरली नसल्याचे दिसून येत आहे. अर्जदारांची वाढती संख्या पाहता अर्जदारांनी आपल्या वाट्याची रक्कम त्वरीत नभरल्यास अर्ज रद्द होवू शकतो. त्यामुळे कोटेशन मिळालेल्या शेतक-यांनी त्वरीत रक्कम भरावी, असे आवाहन महावितरणच्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.
लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर परिमंडळात कुसूम-ब योजनेमधील ६८ हजार ३०९ प्राप्त अर्जदारांपैकी ३९ हजार ६३४ अर्जदार शेतक-यांना कोटेशन पाठवण्यात आले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील २१ हजार १९६ धाराशिव जिल्ह्यातील १० हजार १०७ आणि लातूर जिल्ह्यातील ८ हजार ३३१ शेतक-यांचा समावेश आहे. मात्र अद्यापही यापैकी एकाही शेतक-याने आपल्या लाभार्थी हिस्स्याची रक्कम भरलेली नाही. मागेल त्याला सौरकृषीपंप योजनेसाठी मोठयाप्रमाणावर अर्जदार शेतक-यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोटेशन पाठवूनही अद्याप लाभार्थी वाटा न भरल्यामुळे अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार असून जे शेतकरी त्वरीत लाभार्थी हिस्सा भरतील त्यांनाच प्राधान्याने सौरकृषीपंपांचे वाटप केले जाणार आहे. असे लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोटेशन प्राप्त शेतक-यांनी विनाविलंब कोटेशनचा भरणा करावा.
राज्य सरकारने राज्यात साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. दहा लाखापेक्षा जास्त पंप बसविण्यात येणार असल्याने कृषी पंपासाठी पैसे भरून वीज कनेक्शनची प्रतीक्षा करणा-या सर्व शेतक-यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार आहे. या योजनेत शेतक-यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरुन सिंचनासाठी कृषी पंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतक-यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.