24.5 C
Latur
Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्रस्किप नव्हे तर गेमच खेळत होते

स्किप नव्हे तर गेमच खेळत होते

आव्हाडांनी व्हायरल केले कोकाटेंचे आणखी दोन व्हिडिओ

मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यावर बोलताना माणिकराव कोकाटे यांनी मी युट्युब बघत असताना रमी गेमची आलेली जाहिरात स्किप करत होतो, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माणिकराव कोकाटे यांचे मोबाईलवर रमी गेम खेळतानाचे आणखी दोन व्हिडीओ समोर आणले आहेत. यामुळे माणिकराव कोकाटे यांचा पाय आणखी खोलात गेल्याचे दिसून येत आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जाहिरात स्किप करत नव्हते तर ते जंगली रमीच खेळत होते, असा ठाम दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत आणि यामध्ये कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल, असा दावा आव्हाड यांनी केला आहे. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो, असे आव्हान देखील आव्हाड यांनी दिले आहे.

आणखी किती पुरावे हवेत ते सांगा
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर म्हटले आहे की, एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे. प्रश्नोत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते, जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा… कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो. महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR