24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरस्पर्धेत ३०० संघ, पाच हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी

स्पर्धेत ३०० संघ, पाच हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी

लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी १० च्या तिस-या पर्वाला शनिवार दि. १८ मेपासून दिमाखदार सुरुवात झाली असून तालुकास्तरीय स्पर्धेत लातूर जिल्हा व लोहा-कंधार (जि. नांदेड) तालुक्यातील सुमारे ३०० पेक्षा अधिक संघ सहभागी झाले आहेत. उत्साही वातावरणात सुरु झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत आता कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.
लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशीप संयोजन समितीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दि. १८ ते दि. २१ मे दरम्यान तालुकास्तरीय आणि दि. २२ मे ते २४ मे दरम्यान जिल्हास्तरीय सामने होणार आहेत.  तालुकास्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यात आजपर्यंत लातूर तालुक्यातील ४२, लातूर शहर ३२, उदगीर ४१, अहमदपूर १५, चाकूर २२, देवणी २०, जळकोट १८, रेणापूर २३, शिरुर अनंतपाळ २६, औसा ३२, निलंगा १४ तर लोहा-कंधार तालुक्यातील १३ असे जवळपास ३०० संघ व पाच हजारांपेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवून स्पर्धेत मोठी चूरस निर्माण केली आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणा-या संघास ५१ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असून या संघाला जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच तालुकास्तरावर उपविजेता ठरणा-या संघास ३१ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तरुण पिढीला मैदानी खेळांकडे वळवून चांगले खेळाडू घडविण्यासाठी ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी १०’ ही स्पर्धा घेण्यात येत असून या स्पर्धेच्या तिस-या पर्वालाही क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंसाठी पोषक वातावरण तयार करुन क्रीडा संस्कृती रुजविणे
आणि तिचा विस्तार करणे, हा आमचा प्रयत्न आहे, असे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR