30.3 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeअंतरराष्ट्रीयस्पेन, पोर्तुगाल अंधारात

स्पेन, पोर्तुगाल अंधारात

युरोपात ब्लॅकआऊट, वीजपुरवठा खंडित, फ्रान्सलाही फटका,
 मोबाईल, इंटरनेट, रेल्वे, मेट्रो, विमानसेवा ठप्प, प्रवाशांचे हाल
माद्रिद : वृत्तसंस्था
युरोपियन देश स्पेन आणि पोर्तुगालमध्ये बत्ती गुल झाली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने दोन्ही देशांतील अनेक शहरे अंधारात बुडाली आहेत. दोन्ही देशांच्या राजधान्यांमध्येही काळोख पसरला असून, इंटरनेट, मेट्रो, विमानसेवा ठप्प झाली आहे. फ्रान्समधील काही शहरांमधील वीज पुरवठादेखील प्रभावित झाला आहे. स्पेनची सरकारी वीज कंपनी रेड इलेक्ट्रिकाकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर केला जात असल्याचे ग्रिड ऑपरेटरकडून सांगण्यात आले आहे.

स्पेनच्या स्थानिक वेळेनुसार साडेबारा वाजता संपूर्ण देशभरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे ट्रेन थांबल्या. रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वेच येत नसल्याने प्रवासी खोळंबले. मेट्रो सुरू नसल्याने हजारो प्रवासी आतच अडकले. वीज पुरवठा खंडित झाल्याने माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेवर परिणाम झाला. ही स्पर्धा वर्षातून एकदा खेळवली जाते. क्ले कोर्टवर होणा-या स्पर्धेतील सामने थांबवले गेले. बत्ती गूल झाल्याने स्पर्धेच्या गुणफलकावर परिणाम झाला. कॅमे-यांचे कामही बंद झाले.
स्पेन आणि पोर्तुगाल या दोन देशांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने स्पेनची संसद, रेल्व स्थानके अंधारात बुडाली. मेट्रो स्थानकांमध्येही अंधार पसरला आहे. वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. वीज पुरवठा केव्हापर्यंत सुरळीत होणार याबद्दलची कोणतीही ठोस माहिती सरकार आणि प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत.

१.०६ कोटी लोकसंख्या असलेल्या पोर्तुगालमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने लिस्बन आणि आसपासच्या भागांसह देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागातही बत्ती गूल झाली आहे. युरोपियन वीज प्रणालीत समस्या उद्भवल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. पोर्तुगीज वितरक ई-रेडेसने दिलेल्या माहितीनुसार नेटवर्क पूर्ववत करण्यासाठी कंपनीला काही भागांमधील वीज पुरवठा खंडित करावा लागला. फ्रान्समधील काही भागांमधील वीज पुरवठाही प्रभावित झालेला आहे. वीज गेल्यानं मोबाईल नेटवर्कदेखील काम करत नाही. लिस्बन सबवेदेखील बंद आहे. शहरातील वाहतूक सिग्नल बंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बो-या वाजला आहे.

वाहतूक सेवा ठप्प,
रुग्णांचेही मोठे हाल
स्पेन आणि पोर्तुगालमध्ये ब्लॅकआऊट झाल्यामुळे मेट्रोसह सर्वच सेवा ठप्प आहेत. अनेक रुग्णालयात बॅकअप जनरेटरच्या सहाय्याने सेवा देण्यात येत आहेत तर मेट्रोच्या भुयारात संपूर्ण काळोख पसरल्याने मेट्रोची सेवाही ठप्प आहे. दरम्यान, रुग्णालयातील संसाधनेही विजेअभावी बंद असल्याने रुग्णांचेही हाल होत आहेत.

लोकांनी संयम बाळगावा
ब्लॅकआऊट झाल्याने अनेक ठिकाणी लोकांचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही गोंधळ न घातला संयम बाळगावा, असे आवाहन दोन्ही देशांच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR