सांगली : प्रतिनिधी
स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत. स्मृतीने साखरपुड्याचे, संगीतमध्ये डान्स करातानाचे, मेहंदीचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत. त्यामुळे स्मृती आणि पलाश या दोघांचे चाहते देखील संभ्रमात पडले आहेत. आता या दोघांचे लग्न कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या लग्नाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. स्मृती मानधनाने लग्नाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत वडिलांची तब्येत पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय स्मृतीने घेतला आहे. स्मृतीचे मॅनेजर तोहिन मिश्रा यांनी ही माहिती दिली. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे रविवारी २३ नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. पण लग्नसोहळा सुरू असताना स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यांच्यावर सध्या सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे स्मृती मानधनाचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
स्मृती मानधनाचे सांगलीमध्ये मोठ्या धुमधडाक्यात लग्न होणार होते. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता ती लग्नबंधनात अडकणार होती. पण लग्नाची तयारी सुरू असतानाच दुपारी दीड वाजताच्या सुमारास तिच्या वडिलांची प्रकृती खराब झाली. नाश्ता करताना त्यांना अस्वस्त वाटू लागले. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे रुग्णवाहिका बोलावण्यात आली. लग्नाच्या ठिकाणी रुग्णवाहिका आल्यामुळे एकच गोंधळ उडाला.
स्मृतीच्या वडिलांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर एन्जिओप्लास्टि करण्यात येण्याची शक्यता आहे. वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर स्मृतीच्या लग्नाच्या ठिकाणावरून सर्व पाहुण्यांना परत पाठवण्यात आले. त्यानंतर लग्नाच्या ठिकाणावरून डेकोरेशन देखील काढण्यात आले. स्मृतीचे लग्न स्थगित करण्यात आले असल्याचे सर्वांना सांगण्यात आले. वडिलांची प्रकृती खराब झाल्यानंतर स्मृतीचा होणारा नवरा पलाशची देखील प्रकृती खराब झाली.
त्याच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासर्व घडामोडीनंतर आता स्मृती मानधनाने मोठा निर्णय घेतला. जोपर्यंत वडील पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला.

