मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीवीर स्मृती मंधाना लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. इंदूर येथे सुरू असलेल्या महिला वनडे विश्वचषक २०२५ मधील भारत-इंग्लंड सामन्यापूर्वी स्मृतीचा प्रियकर आणि बॉलिवूड संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल याने या लग्नाची घोषणा केली. या खुलाशाने स्मृतीच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ विश्वचषकात उपांत्य फेरी गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. यंदाच्या विश्वचषकात स्मृती मंधाना अद्याप पूर्ण फॉर्मात दिसलेली नाही, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने चांगली फलंदाजी करत फॉर्मात परतण्याचे संकेत दिले आहेत. इंदूर येथील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती आणि तिने खेळलीसुद्धा तरी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. विशेषत: आता ती लवकरच इंदूरची सून होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पलाश मुच्छलने स्मृतीसोबतच्या नात्याबद्दल बोलताना सांगितले, स्मृती लवकरच इंदूरची सून होणार आहे. मी आता एवढेच सांगेन. मी तुम्हाला हेडलाइन दिली आहे. ३०वर्षीय पलाश हा इंदूरचा रहिवासी असून, तो त्याची मोठी बहीण पलक मुच्छल यांच्यासह बॉलिवूड चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. सध्या तो ‘राजू बाजेवाला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, यात अविका गोर आणि चंदन रॉय मुख्य भूमिकेत आहेत.

