22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रस्वत:च्या जाहिरातींसाठी इतरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न

स्वत:च्या जाहिरातींसाठी इतरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न

पुणे : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकार विविध योजनांचा पाऊस पाडत आहे. अशातच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या जाहिरातीत गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो छापण्यात आला. त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना धक्काच बसला. यावरून शिवसेनेच्या (उबाठा गटाच्या) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

विधानसभा डोळ्यांसमोर ठेवत महायुती सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत राज्यातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घडविण्यात येणार आहे. या योजनेची सरकारने जाहिरातसुद्धा सुरू केली आहे. ही जाहिरात प्रसिद्ध होताच या जाहिरातीमधील वयोवृद्धाच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला. या जाहिरातीमध्ये ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो वापरला आहे.

पुणे जिह्यातल्या शिरूर तालुक्यातील ज्ञानेश्वर तांबे हे मागील तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. पण ते सापडले नाहीत. पण ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे‘च्या जाहिरातीमध्ये तांबे यांचा फोटो प्रसिद्ध झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जाहिरातीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असताना अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले, हे महायुतीचे सरकार जनसामान्यांचे नसून हे भांडवलदारांचे सरकार आहे. हे जाहिरातबाजी करणारे सरकार आहे. ‘सरकार चाराने की मुर्गी और बाराने का मसाला’ असे आहे.

वारक-यांचे भले करण्यापेक्षा स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची सरकारला घाई झाली आहे. त्यामुळे घाई-घाईमध्ये सरकारने जाहिरात करताना पुण्याच्या शिरूर येथील ज्ञानेश्वर तांबे नावाच्या बेपत्ता झालेल्या वारकरी माणसाचा फोटो आपल्या जाहिरातीत छापला. तीन वर्षांपासून त्यांना तांबे कुटुंबीय शोधत होते.

तेव्हा त्यांना असे वाटायला लागले की आपला माणूस मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये आहे की काय? ज्ञानेश्वर तांबे यांचा मुलगा भरत तांबे यांनी तक्रार केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. सरकार स्वत:च्या जाहिरातींसाठी इतरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे, अशा तिखट शब्दांत सुषमा अंधारे यांनी सरकारवर निशाणा साधला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR