37.1 C
Latur
Sunday, April 6, 2025
Homeलातूरस्वमग्न मुलांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज

स्वमग्न मुलांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज

लातूर : प्रतिनिधी
ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता हा दिव्यांगत्वाचा एक प्रकार सध्या लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. लवकर निदान आणि वेळीच उपचार करुन या दिव्यांगत्वाची तीव्रता कमी करता येते. स्वमग्नता असलेल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा बौद्धिक व मानसिक विकास साधण्यासाठी पालक, समाज यांच्या विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे केंद्र सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाचे आयुक्त एस. गोविंदराज यांनी आज येथे सांगितले.
जागतिक स्वमग्नता दिनानिमित्त संवेदना प्रकल्पात लातूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, संवेदना प्रकल्प आणि सक्षम देवगिरी प्रांत आणि जिव्हाळा पालक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी गोविंदराज बोलत होते. यावेळी राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य सुरेश पाटील, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर आणि उमंग इन्स्टिट्युटचे डॉ. प्रशांत उटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लवकर निदान आणि नियमित उपचारांमुळे कोणत्याही प्रकारच्या दिव्यांगत्वाची तीव्रता कमी होऊ शकते. स्वमग्नता असलेल्या मुलांना सुरुवातीच्या काही वर्षांत चांगले उपचार आणि योग्य शिक्षण दिल्यास त्यांची स्वमग्नता कमी होऊन ते सामान्य जीवन जगू शकतात. त्यांच्यातील कलागुण आणि कौशल्यांना चालना देण्यासाठी शासन, प्रशासनासह समाजाच्या सहभागाची आवश्यकता आहे. दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना समाजातील विविध संस्था आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गोविंदराज यांनी केले. गर्भवती महिलांचा आहार आणि मानसिक स्थिती यांचा परिणाम मुलांमध्ये दिव्यांगत्व निर्माण होण्यावर होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांना सकस आहार आणि मानसिक संतुलन राखण्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात न्यूरोफिजिशियन डॉ. देवाशिष रुईकर यांनी स्वमग्नता म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि उपचार यांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर रिहॅबिलिटेशन सायकोलॉजिस्ट किर्तीसुधा राजपूत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. श्रीहर्ष जहागीरदार आणि सदिच्छा गतिमंद विद्यालयाचे उपाध्यक्ष डॉ. आनंद कापसे यांनीही मार्गदर्शन केले. विशेष शाळांतील सुमारे १६५ शिक्षक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
यावेळी गरजू दिव्यांगांना आधुनिक चष्मा, काठी, व्हीलचेअर आणि पीएलएम किटचे वितरण करण्यात आले. तसेच, संवेदना प्रकल्पातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकट लामजाने यांनी केले, तर डॉ. योगेश निटूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाड, श्रीमती येडले, दीपक क्षीरसागर, पारस कोचेटा, श्याम शेटे यांनी प्रयत्न केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR