लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख हे उत्तम रसिक व संगीत जाणकार होते. त्यामुळे त्यांच्या स्मृती या चिरकाल राहायला हव्यात याच उद्देशाने हा स्वरविलास संगीत दरबार यापुढे अविरत चालू राहण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन स्वागत अध्यक्ष सहकार मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
आवर्तन मासिक संगीत सभेच्या ११४ व्या मासिक संगीत सभेच्या निमित्ताने आवर्तन अष्टविनायक प्रतिष्ठान व मांजरा परिवार यांच्या वतीने लोकनेते विलासराव देशमुख यांना समर्पित स्वरविलास संगीत दरबार दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख, अष्टविनायक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती.
पंडितजींनी आपल्या गायनाची सुरुवात पूर्वी रागाने केली. तसा पूर्वी राग फारसा ऐकावयास मिळत नाही. परंतु पंडितजींनी या रागामध्ये दोन्ही मध्यमानचे विविध सौंदर्यपूर्वक रागाची बाढत करुन रसिकांवर स्वर मोहिनी केली. या रागात विलंबित एकतालमधील बंदिश ‘अरज सुनो श्री श्यामला माता मोरी’ व त्यानंतर द्रुत तीनताल बंदिश ‘दुर्गे भवानी दयानी सकल जगत जननी दु:ख हरनी\ या दोन्हीही बंदिश स्वत: पंडित संजीव अभ्यंकर यांनीच रचलेल्या होत्या, पूर्वी रागानंतर राग रागेश्रीमधील बंदिश ‘माइरी मेरो श्याम लग्यो संग डोले।’ व द्रुत तीनताल ‘साजना रे जिया लागत ना।’ यानंतर पंडितजींनी वातावरणाला पोषक राग मेघ गाण्यासाठी निवडला या रागामध्ये ताल द्रुत एकतालमध्ये ‘उमड़ घुमड़ घन गरजे कारे कारे बदरा डराये’, ही स्वरचित बंदिश अतिशय तयारीने सादर केली आणि या मेघ रागाने आपल्या शास्त्रीय गायनाची सांगता केली. शेवटी ‘ध्यान लागले रामाचे’ व ‘आता कोठे धावे मन।’ हे केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेले अतिशय सुप्रसिद्ध अभंग गाऊन आपल्या गायनाची सांगता केली.
त्यांना समर्पक तबला साथ सुप्रसिद्ध तबलावादक रोहित मुजुमदार व संवादिनी साथ संगत सुप्रसिद्ध संवादिनी वादक निलेश साळवी यांनी केली तर युवा पखवाज वादक बंकटकुमार बैरागी यांनी पखवाज साथ संगत केली व लातूर येथील कलावंत बालाजी चौधरी यांनी टाळ साथ संगत केली , पंडितजींचे शिष्य साई पांचाळ यांनी उत्तम अशी स्वर साथ पंडितजींना दिली व तानपुरा साथ शर्वरी डोंगरे हिने केली. याच कार्यक्रमांमध्ये चिगरी गुरुजींचे पट्ट शिष्य विशाल जाधव यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा पंडित शांताराम चिगरी गुरुजी युवा पुरस्कार आळंदी येथील स्वरित बळवंत पांचाळ याला मानपत्र स्मृतिचिन्ह व ११ हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अभय शहा व आभार प्रदर्शन डॉ. संदीप जगदाळे यांनी केले. या कार्यक्रमाचे अतिशय रसाळ वाणीमध्ये वैभव कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन
केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक अतुल देऊळगावकर, डॉ. अजित जगताप, किरण भावठाणकर, विशाल जाधव, आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, डॉ. संदिपान जगदाळे, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, संजय सुवर्णकार, महेश काकनाळे, संजय अयाचित, केशव जोशी, हेमंत रामढवे, दत्ता पाटील, शंभुदेव केंद्रे, सुरेश कुलकर्णी, विनायक राठोड, निलेश पाठक, हरीराम कुलकर्णी, व्यंकटेश पांचाळ, तेजस धुमाळ, दिनकर पाटील, काकासाहेब सोनटक्के, डॉ. भदाडे, शशिकांत देशमुख, डॉ. वृषाली देशमुख, गीता मुंढे, डॉ. मंजुषा कुलकर्णी, देवदत्त कुलकर्णी, विवेक डोंगरे, लक्ष्मीकांत तुबाजी, प्रकाश भोकरे, खंडू जेवळीकर यांनी परिश्रम घेतले.