22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीय विशेषस्वागतार्ह पाऊल

स्वागतार्ह पाऊल

जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण अशा वारसा स्थळांना ‘युनेस्को’च्या वतीने जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केले जाते. अशी वारसा स्थळे भारतामध्ये ४२ असून जगामध्ये त्यांची संख्या ११९९ इतकी आहे. वारसा स्थळांच्या संख्येमध्ये जगात भारतापेक्षाही इटाली, चीन इत्यादी राष्ट्रे पुढे आहेत. खरे पाहता समृद्धसंपन्न असा सांस्कृतिक वारसा असूनही गेल्या ७५ वर्षांत भारताने या सांस्कृतिक स्थळांच्या बाबतीत फारसे स्वारस्य दाखवलेले नाही. त्यामुळे कितीतरी संपन्न, समृद्ध सांस्कृतिक वारसास्थळे अजूनही अंधारातच चाचपडत आहेत. याबाबतीत १९८० च्या दशकात भारतीय पुरातत्वच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील अंजिठा, वेरूळ यासारख्या जगद्विख्यात लेणींचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आला. आता विद्यमान राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अजिंक्य अशा ११ गडांची जागतिक वारसा स्थळांसाठी शिफारस केली आहे. ही बाब महाराष्ट्राच्या समृद्ध, सांस्कृतिक वारसा अधिक सुसंपन्न करणारी आहे. त्याहीपलीकडे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रामध्ये नवीन क्रांती घडवून आणणारी आहे. जागतिक वारसा म्हणून महाराष्ट्रातील गडकोटांची नोंद झाल्यास महाराष्ट्रातील पर्यटनाचा परतावा गतीने वाढणार आहे. देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात नव्या रोजगार संधीची उपलब्धी होणार आहे.

सध्या नव्या जगातून आणि युरोपातून भारताकडे येणारे पर्यटक हे प्रामुख्याने दिल्ली, आग्रा, जयपूर या गोल्डन ट्रँगलमध्येच अडकलेले दिसतात. त्याचे कारण असे की इंग्लिश पुरातत्वज्ञ कर्नल जेम्स टॉड यांनी ‘अ‍ॅनल्स अँड अँटीक्युटीज ऑफ राजस्थान’ नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी राजस्थानातील पर्यटनाचे रसभरित वर्णन केले. हे रोमांचक वर्णन युरोपात घरोघरी वाचले जाऊ लागले. परिणामी भारत बघायला येणा-या पर्यटकांना आजही पहिले आकर्षण असते ते राजस्थानचे. राजस्थानातील मोठमोठे किल्ले, युद्धस्थळे, आलिशान राजवाडे पाहून त्यांचे डोळे दीपून जातात. त्यानंतर ते ताजमहाल पाहतात. दिल्लीमधील काही जुन्या इमारती पाहतात आणि परतीच्या प्रवासाला लागतात. देशात येणा-या विदेशी पर्यटकांपैकी ५ ते ७ टक्के पर्यटक फक्त अंजिठा किंवा वेरूळ पाहण्यासाठी दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीत येतात. पूर्वी दिल्ली, जयपूर, उदयपूर आणि औरंगाबाद ही जी विमानसेवा होती ती ३० वर्षांपासून खंडित करण्यात आली.

त्यामुळे पर्यटकांना अजिंठा-वेरूळचे वैभव काही दिसत नाही. महाराष्ट्राच्या गडकोटाकडेही पर्यटकांचे दुर्लक्ष होते. व्हिएतनामचे मुक्तीदाता, स्वातंत्र्ययोद्धे होचीमीन यांनी भारतात आल्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड पाहावयाचा आहे अशी विनंती केली होती तेव्हा त्यांच्यासाठी स्वतंत्र विमानाने रायगड पाहण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली. तेथील मूठभर माती घेऊन ते आपल्या देशात गेले आणि त्यांनी आपल्या देशातील लोकांना गनिमी युद्ध लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली असे अभिमानाने सांगितले. छत्रपती शिवाजीराजे हे युगपुरुष होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारलेले स्वराज्य स्थापन करणा-या छत्रपतींचे ३०० हून अधिक किल्ल्यांपैकी २०० किल्ले स्वत: महाराजांनी उभारलेले आहेत. पेशवाई पडल्यानंतर इंग्रजांनी सत्ता हातात घेताना या गडकोटांना आगी लावून भेसूर करून टाकले. त्यानंतर महाराष्ट्रातील गडकोटांच्या संरक्षण, संवर्धन या कामाकडे दुर्लक्ष झाले.

गेल्या काही वर्षांत पुन्हा एकदा गडसंवर्धनाच्या प्रक्रियेला चालना दिली जाऊ लागली; पण तरी देखील पुरातत्व खात्याकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन आणि अपुरी वित्तीय तरतूद ही कायम राहिली. या पार्श्वभूमीवर शिवकाळातील ११ गडकोटांचे संवर्धन आणि विश्व वारसा स्थळांमध्ये त्यांचा समावेश होण्यासाठी केलेले प्रयत्न स्वागतार्ह आणि स्पृहणीय म्हणावे लागतील. या गडकोटांच्या व्यवस्थापनाचा, त्यांच्या नियोजनाचा, त्यातील पद्धशीर नियंत्रण, संतुलन आणि व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास केला असता असे दिसते की, मध्ययुगीन काळातही अत्यंत प्रगत अशी संरक्षण व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकालामध्ये विकसित केली होती. त्यामुळे मध्य आशियातून भारतावर चालून आलेल्या मुघलांना परास्त करून हिंदवी स्वराज्याची ध्वजा गगनामध्ये उंच उंच फडकवण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले. महाराष्ट्रातील गडकोटांच्या वैभवांचा इतिहास विदेशी पर्यटक, अभ्यासक, संशोधक यांच्यासमोर आणण्यासाठी काही गोष्टी प्राधान्याने करावयास हव्यात.

पहिले म्हणजे, गडकोटांच्या सुरक्षा आणि वैभवाच्या सुवर्ण कडा पुन्हा प्रकाशमान होण्यासाठी त्यांच्या संवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. मुख्य शहरापासून गडकोटापर्यंत उत्तम दर्जाच्या रस्त्यांचे जाळे तयार करावे लागेल. रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक आणि रस्ते वाहतूक यामध्ये ज्या समन्वयाची गरज असते तशा समन्वयाची व्यवस्था महाराष्ट्रात नसल्यामुळे रायगडावर पोहोचणे किंवा प्रतापगडावर पोहोचणे, शिवनेरीवर पोहोचणे राजगडावर पोहोचणे या बाबी म्हणजे पर्यटकांना साहस वाटू लागतात. खरे तर या सर्व गडकोटांना एकमेकांशी जोडून त्यांचे पर्यटन शास्त्राप्रमाणे सर्कीट तयार केल्यास तेथे पोहोचण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडकोटांचे पावित्र्य राखण्यासाठी, तेथील जिवंत इतिहास बोलका करण्यासाठी कल्चरल लुकआऊट नोटीस म्हणजे सांस्कृतिक इतिहासाचे पट लोकभाषेमध्ये उलगडले पाहिजेत. इंग्रजी तसेच मराठी भाषेमध्ये या गडकोटांचा थोडक्यात आणि प्रभावी असा इतिहास प्रकट केला पाहिजे. अलीकडे काही सीडीज् आणि व्हीसीडीजही काही गडकोटांबद्दल उपलब्ध आहेत. पण ते प्रकाशाच्या वाटेपासून दूरच आहेत. आपणास गडकोटाच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकण्यासाठी नव्या साहित्याची आवश्यकता आहे. विशेषत: असे साहित्य आंतरराष्ट्रीय पर्यटकांना खेचण्यासाठी म्हणून अव्वल दर्जाच्या इंग्रजीमध्ये आणि तेवढेच गतिमान व आक्रमक पद्धतीने लिहिले गेले पाहिजे.

कर्नल टॉड यांच्या राजस्थानच्या पुस्तकाचा आदर्श ठेवून महाराष्ट्रातील गडकोटांचा इतिहास लिहिला गेला तर युरोपातील पर्यटकांचे लोंढे महाराष्ट्राकडे वळवता येऊ शकतील. हे काम तसे अवघड वाटत असले तरी अशक्य आहे असे नाही. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडकोटांच्या सांस्कृतिक इतिहासातील मर्मभेदक अशा अंतप्रवाहाचे नव्याने आकलन करणे. उदाहरणार्थ, पन्हाळगडावरील अत्यंत महत्त्वाच्या अशा युद्धक्षेत्राचे काय वैशिष्ट्य आहे, प्रतापगडावरील युद्धक्षेत्राचे स्थान कोणते आहे, शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने पन्हाळगड ओलांडून विशाळगडाकडे कूच केली या सर्व रोमहर्षक प्रसंगांचे अलीकडे चित्रपटातून प्रकटीकरण होत आहे. परंतु वॉर टुरिझम किंवा युद्ध पर्यटन यादृष्टीने विचार करता १६४६ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला तोरणा, १७९५ मध्ये मराठ्यांनी निजामाला धूळ चारत जिंकलेली खर्ड्याची लढाई यांसारख्या थरारक कथा तितक्याच समर्पकपणाने इंग्रजी भाषेतून जागतिक स्तरावर प्रसारित व्हायला हव्यात.

-डॉ. वि. ल. धारुरकर,
ज्येष्ठ विचारवंत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR