28.4 C
Latur
Sunday, April 13, 2025
Homeमहाराष्ट्र‘स्वारगेट’ पीडितेला सरकारकडून मिळणार ३ लाखांची मदत

‘स्वारगेट’ पीडितेला सरकारकडून मिळणार ३ लाखांची मदत

पुणे : प्रतिनिधी
स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरील सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे. स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने दोन वेळा अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलिसांत आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडितेला राज्य सरकार मदत करणार आहे.

स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पीडितेला राज्य सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दिली जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच ही रक्कम पीडितेला प्रदान केली जाईल. बलात्काराची ही धक्कादायक घटना २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटेच्या वेळी स्वारगेट एसटी स्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये घडली होती.

पीडित तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केली होती. त्याला १२ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या घटनेने शहरात खळबळ उडवून दिली होती. पीडितेच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडून तीन लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

आरोपीच्या वकिलांना गाडेला भेटायची परवानगी
आरोपीला हजर केल्यानंतर त्याच्याशी न्यायालय परिसरातच बोलण्यासाठी परवानगी देण्याची मागणी, त्याचे वकील अ‍ॅड. वाजेद खाँ-बीडकर यांनी केली होती. नंतर आरोपीची कारागृहात रवानगी झाल्यावर कारागृहात जाऊन त्याची समोरासमोर मुलाखत घेण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. अ‍ॅड. बीडकर यांचा अर्ज न्यायालयाने मंजूर करत गाडेला भेटण्याची परवानगी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR