मुंबईचा महापौर मराठीच होणार, फडणवीस-शिंदे यांची ग्वाही
मुख्यमंत्र्यांचेही लाव रे तो व्हिडिओ
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई व मुंबईतील मराठी माणूस सुरक्षित आहे. कोणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई वेगळी होऊ शकत नाही. मुंबई नाही तर ठाकरे बंधूंचे अस्तित्व, त्यांचे राजकारण धोक्यात आले आहे. त्यामुळे मुंबई खतरेमेंची आवई उठवली जात असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवाजी पार्कवरील प्रचारसभेत केली. मुंबईचा पुढचा महापौर महायुतीचाच आणि मराठीच होणार याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची मुदत मंगळवारी सायंकाळी संपत आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या मुंबईतील प्रचाराची सांगता आज शिवाजी पार्क मैदानावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभेने झाली. उद्धव आणि राज ठाकरे यांनी रविवारी याच मैदानावर झालेल्या सभेत आरोपांची आतषबाजी केली होती. या आरोपांचा आज शिंदे-फडणवीसांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप आणि टीकेचा व्हिडिओ लावून टीकेचा समाचार घेतला.
केंद्रातील भाजपा नेत्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला होता. याचा समाचार घेताना मुंबई नाही तर यांचे राजकारण धोक्यात आल्याचे सांगितले. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही वेगळी करू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तर मुंबई म्हणजे काय रेल्वेचा डब्बा आहे का? की वाट्टेल तेथे जोडायला? असा सवाल करत शिंदे यांनी ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली.
केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून उद्योगपती गौतम अदानीच्या विस्ताराकडे लक्ष वेधताना ठाकरे बंधूंनी गंभीर आरोप केले होते. फडणवीस यांनी भाजपा व्यतिरिक्त अन्य कोणकोणत्या राज्यात अदानीच्या कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा तपशील सांगत या आरोपांचे खंडन केले तर एकनाथ शिंदे यांनी गौतम अदानी उद्धव व राज ठाकरे यांच्या घरी स्रेहभोजनासाठी गेले होते, याकडे लक्ष वेधताना तुम्ही त्यांचा पाहुणचार करणार, उद्योगपतींच्या लग्नात तुमची पोरं नाचणार, तुमच्या मित्रपक्षांचे नेते त्यांच्या गाड्या चालवणार आणि आरोप आमच्यावर करणार का? असा सवाल केला.
२५ वर्षांत तुम्ही काहीच केले नाही
तुम्ही मातोश्री १ वरुन मातोश्री २ वर गेले, राज ठाकरे कृष्णकुंजवरून शिवतीर्थवर गेले. कारण तुम्हाला जागा पुरत नाही. मग गेल्या २५ वर्षांपासून नवी मुंबईत विमानतळ करायची मागणी होती, तुम्ही काहीच केले नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती दिली. आता आम्ही तिसरे विमानतळही मुंबईत करतोय, याची घोषणा करतो., अशा शब्दांत फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या आरोपावर पलटवार केला.
निवडणुका आल्यावरच
यांना मराठी माणूस दिसतो
काही लोकांना केवळ निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो. इतरवेळी नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स हेच कळते, यांच्याच काळात मराठी माणूस बाहेर फेकला गेला, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता राज ठाकरेंवर शिवाजी पार्क मैदानातून टोला लगावला. मराठी माणसाचे अस्तित्व कधीच धोक्यात नव्हते, आजही नाही आणि उद्याही नाही. मुंबईचे हीत जपायला आम्ही समर्थ आहोत, एकनाथ शिंदे मराठी नाही का, फडणवीस मराठी नाहीत का? २० वर्षापूर्वी एकत्र का नाही आलात, आता स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आला आहात, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.

