अहमदपूर : प्रतिनिधी
सामान्य माणसाला अभिप्रेत असलेला अहमदपूर शहराचा विकास साधायचा असेल, तर या नगरपालिका निवडणुकीत स्वार्थी महायुतीला बाजूला करा आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
अहमदपूर नगरपरिषद निवडणूकच्या निमित्ताने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी अयोजित विराट प्रचार सभेत माजी मंत्री, आमदार अमित देशमुख बोलत होते. प्रारंभी २६/११ हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तत्पूर्वी, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख आणि मान्यवरांनी संविधान दिनानिमित्त अहमदपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व संविधान उद्देशिकेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या सभेला खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी मंत्री विनायकराव पाटील, नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार, शिवसेना (उद्धव ठाकरे पक्ष) चे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, एन.आर. पाटील, प्रमोद जाधव, अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत मद्दे, माधवराव जाधव, सोमेश्वर कदम, भारत सांगवीकर, राम बेल्लाळे, जरानखान पठाण, निलेश देशमुख, सिराज जहागीरदार, सांब महाजन, दत्ता हेंगणे, विकास महाजन, सिद्धार्थकुमार सूर्यवंशी आदिसह काँग्रेस पक्षाचे, महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार देशमुख यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची महाविकास आघाडी एकसंघपणे निवडणुकीत उतरली असून, सामान्य माणसाला अभिप्रेत असलेला अहमदपूर शहराचा विकास साधण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष पदाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शेख कलीमोद्दीन अहेमद हकीम आणि २५ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा कोर्ट रोड परिसरातील हॉटेल साई प्रीतम समोर पार पडली.
महायुती स्वार्थी; महाविकास आघाडी एकसंघ
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी महायुतीवर टीका केली. ते पुढे म्हणाले, राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या स्वार्थी राजकीय पक्षांची महायुती अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत टिकलेली नाही, याउलट सर्व समाज घटकांना सोबत घेऊन, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी महाविकास आघाडी मात्र एकसंघ राहून भक्कमपणे उतरली आहे. या निवडणूकीत सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळख असलेले माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील या आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. पूर्वी मुख्यमंत्री असताना लोकनेते विलासराव देशमुख यांनी विनायकराव पाटील यांच्यामार्फत अनेक सिंचन प्रकल्प बांधले आणि शहर विकासाच्या योजना राबवल्या. मात्र आज प्रशासकाच्या माध्यमातून महायुतीची सत्ता असलेल्या नगर परिषदेत भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही, अशी आमदार देशमुख यांनी खंत व्यक्त केली. यावेळी पूढे बोलतांना ते म्हणाले, अहमदपूरचा विकास करण्यासाठी, शैक्षणिक वातावरण, व्यापारी संकुल, बाग-बगीचे, नियमित पाणीपुरवठा, कचरा आणि दिवाबत्तीचे व्यवस्थापन तसेच आरोग्य सुविधा उभारण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना हाताचा पंजा, तुतारी आणि मशाल या चिन्हांसमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार यांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे भावनिक आवाहन केले. तर लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे यांनी गेल्या १५ वर्षांत सत्ताधा-यांनी केलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी म्हणाले की, अहमदपूर शहरात मूलभूत सोयी, सुविधांचा अभाव आहे. नगरपरिषदेत भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात झाला आहे. नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार हे सामान्य कुटुंबातील आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना, हाताचा पंजा, तुतारी आणि मशाल या निवडणूक चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन यावेळी बोलताना केले.

