नागपूर : वृत्तसंस्था
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या, काय हरकत आहे? अशी मागणी करीत उद्धव ठाकरे यांनी आता स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेहरूंबद्दल बोलणे यापुढे काँग्रेस आणि भाजपने बंद करावे, असे म्हणत शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षांना खडेबोल सुनावले. काँग्रेसकडून सावरकरांवर केल्या जाणा-या टीकेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली.
ठाकरे म्हणाले, अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचे रडगाणे बंद करावे आणि काँग्रेसने सुद्धा सावरकरांच्या नावाने बोलणे बंद करावे. कारण दोघेही आपापल्या जागी योग्य होते. आपण काय करणार आहोत, हे आता लोकांना दाखवावे. मुळात सावरकरांना भाजपने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे? का देत नाहीत? त्यांना भारतरत्न द्या, अशी मागणी ठाकरेंनी केली. देवेंद्र फडणवीस मागे मुख्यमंत्री होते, तेव्हा दोन-तीन वेळा पत्र दिले. ते पत्र केराच्या टोपलीत गेले.
त्यावेळी मोदीच होते ना पंतप्रधान? अगदी तारखांसह पत्र माझ्याकडे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, आताचेही तेच आहेत, पण त्यावेळी केलेली विनंती अद्याप भाजपचे वरिष्ठ नेते मानत नसतील, तर त्यांना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.