लातूर : प्रतिनिधी
भगव्या पताका, विद्यूत रोषणाईचा झगमगाट, फटाक्यांचा कडकडाट, मराठमोळ्या पेहरावात भगवे फेटे बांधून आलेल्या माता-भगिणी अन् शिवरायांचा अखंड जयकार, अशा उत्साही वातावरणात लातुरकरांनी बुधवारी शिवजन्माचे स्वागत केले. मध्यरात्री जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, एसडीएम रोहिणी न-हे-विरोळे, डॉ. बावकर, डॉ. श्वेता काटकर-पवार व महिलांनी बाळ शिवबांचा पाळणा झुलवला अन् सारा परिसर पुन्हा शिवरायांच्या गगनभेदी जयकाराने निनादून गेला.
खासदार डॉ. शिवाजी काळगे, मनपा उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, सावर्जनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, हंसराज जाधव अॅड. उदय गवारे, वैजनाथ जाधव, कालिदास माने, धनंजय शेळके, डी. एस. पाटील, नेहरु देशमुख, प्रमोद साळुंके, नितीन पवार, विजय जाधव, दत्तात्रय जाधव, सतिश साळुंके आदींसह अनेकांची उपस्थिती होती. पाळणा उत्सवाचे व्यापक नियोजन करण्यात आले होते. मोठा मंच उभारण्यात आला होता. शिवशाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
जगद्गुरु नरेद्र माऊली गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी लेझिम सादर केले. वेणुताई होस्टेलच्या स्नेहा लोखंडे हिने शिवकार्यावर मनोगत व्यक्त केले. रात्री ८ वाजेपासूनच महिला, विद्यार्थींनी तसेच नागरीकांनी कार्यक्रमस्थळी येण्यास रांगा लावल्या होत्या. सारा चौक शिवप्रेमींनी गजबजला होता. समितीच्या वतीने सर्वांचेच भगवे फेटे बांधून स्वागत करण्यात येत होते. दरम्यान रात्री ९ वाजता शिव वंदनेने शाहीर खुडूसकर व त्यांच्या संचाने कार्यक्रमास सुरुवात केली.
वीर मावळ्यांची शिवभक्ती, शक्ती व युक्तीचे गुणगाण करणारी गीते अन् पोवाडे सुरु झाले. शाहीर साबळेंच्या महाराष्ट्र गिताने डफावरील थापेने, तुता-यांच्या निनादाने, उपस्थितांना शिवभक्तीचे भरते आले होते. अवघे वातावरण शिवमय झाले होते. रात्री पावनेबाराच्या सुमारास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व अन्य मान्यवर आले. सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पाळणा झाला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. साखर वाटून या उत्सवाचा समारोप करण्यात आला. दरम्यान खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. समितीच्या डॉल्बी मुक्त जयंतीच्या निर्णयाचे स्वागत करीत त्यांनी याचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.