लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त दि. १४ ऑगस्ट रोजी लातूर शहर व परीसरात विविध समाजउपयोगी उपक्रम घेण्यात आले. आयएमए, डेंटल, निमा, होमिओपॅथी असोसिएशन व व्हीडीएफ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जवळपास ३०० खासगी रुग्णालयात महाआरोग्य शिबिर आयोजीत करुन मोफत व माफक दरात आरोग्य सेवा देण्यात आली. काही प्राथमिक आरोगय केंद्रातही हा उपक्रम घेण्यात आला. या महाआरोग्य शिबीरास सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरांच्या निमित्ताने हजारो रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले.
रुग्णांना मोफत औषधींचेही वितरण करण्यात आले. लातूर शहर व परीसरातील जवळपास सर्वच खासगी रुग्णालयात १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजतापासून विलासराव देशमुख महाआरोग्य शिबीराची सुरुवात झाली. या ठिकाणी गरजु रुग्णांनाची मोफत तपासणी करण्यात येऊन बहुतांशी रुग्णांवर तातडीने प्राथमिक उपचारही करण्यात आले. महाआरोग्य शिबीरात साथीचे रोग, -हदयरोग, कॅन्सर आदींसारख्या खर्चीक आजारांचीही तपासणी व उपचार करण्यात आले.
या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ६६ हॉस्पिटलसह ९० डॉक्टर्स तर जिल्हाभरातील एकूण ३०० पेक्षा अधिक हॉस्पिटल्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपआपल्या परिसरातील गरजू रुग्णांची सोय व्हावी, त्यांना योग्य ती उपचार यंत्रणा उपलब्ध करून देणे सुखकर व्हावे याकरिता शिबिराच्या आधीपासूनच रुग्णांना त्याविषयी सविस्तर माहिती देण्याचे काम केले आहे. शिबिराच्या आधी चार दिवस एखादा रुग्ण उपचारासाठी आला असेल व त्याचा उपचाराचा खर्च अधिक होत असेल तर लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ डॉक्टर मंडळींनी, अशा रुग्णांना मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते,
लातूर शहर व जिल्ह्यातील जवळपास सर्वच आजारांवर उपचार करणा-या तज्ज्ञ डॉक्टरांनी या महाआरोग्य शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला. या महाआरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, सचिव डॉ. गणेश बंदखडके, महाआरोग्य शिबीराचे शहर समन्वयक कल्याण बरमदे, डॉ. अशोक पोद्दार, ग्रामीण समन्वयक डॉ. दिनेश नवगीरे, डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. उत्तम देशमाने, डॉ. मुकेश आरडले, निमाचे अध्यक्ष डॉ. मनोज देशमुख, होमिओपॅथिक असो.चे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम दरक, महीला विभागातून डॉ. विमल डोळे, डॉ. क्रांती साबदे यांसह सर्व पदाधिका-यांनी सर्वतोपरी परिश्रम घेतले.