लातूर : प्रतिनिधी
इस्लामच्या पाच तत्वांपैकी एक असलेल्या हज यात्रेसाठी लातूर जिल्ह्यातून ४२२ भाविक महिनाभरात रवाना होत आहेत. शुक्रवारी लातूर शहरातील साठफूट रोडवरील एम. के. फंक्शन हॉल, खोरी गल्ली लातूर भागातून हज यात्रेसाठी निघालेल्या भाविकांनी देशात सामाजिक सलोखा टिकून रहावा, भाईचारा वाढावा यासाठी सामुहिक प्रार्थना केली. व हे भाविक मुंबईच्या दिशेने ट्रॅव्हल्सने व रेल्वे ने तसेच खाजगी वाहनांने रवाना झाले.
लातूर जिल्ह्यातून यावर्षी ४२५ भाविकांची हज यात्रेसाठी निवड झाली आहे. त्यांची आरोग्य तपासणी, करन्सी एक्सचेंज, लसीकरण तसेच हज यात्रेत घ्यावयाची काळजी, तेथील प्रार्थनेची सर्व माहितीसाठी शिबिरातून तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ३० एप्रिलपासून भाविकांची रवानगी सुरु झाली आहे. त्यात ३० एप्रिल रोजी ३, १ मे रोजी २, १६ मे रोजी ४२, १९ मे रोजी २८४ तर ३० मे रोजी दोन भाविक हज यात्रेसाठी रवाना होत आहेत. असे ३३३ भाविक मुंबई विमानतळावरून तर ८९ भाविक हैदराबाद येथील विमानतळावरून हज यात्रेसाठी जात आहेत.