लातूर : प्रतिनिधी
नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतक-यांचे सोयाबीन पूर्णपणे खरेदी झाले नाही. अशातच तुर खरेदीसाठी नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर दि. २४ जानेवारी पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. सदर नोंदणीचा कालावधी हा ३० दिवसाचा असून शेतक-यांना २२ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करता येणार आहे. हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करणा-या शेतक-यांना तुरीच्या विक्रीनंतर ७ हजार ५५० रूपये प्रतिक्ंिवटल दर मिळणार आहे.
गेल्यावर्षी खरीप हंगाम मध्ये जिल्हयात ६ लाख ९ हजार ८३३ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या. या मध्ये ४ लाख ९९ हजार १३६ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला होता. तसेच तूरीचा ७३ हजार ८२० हेक्टरवर पेरा झाला होता. सध्या सोयाबीन व तुर काढणी नंतर आडत बाजारात शेतमालाची मोठया प्रमाणात आवक सुरू आहे. लातूरच्या आडत बाजारात तुर येण्यापूर्वी चांगले दर होते. तुर हा शेतमाल आडत बाजारात दाखल होताच दरात कमालीची घसरण झाली.
नोव्हेंबर मध्ये ११ हजार ६०९ रूपये सर्वाधीक दर असणारी तूर आज ७ हजार ७०० रूपयांवर आली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिण्यात तुरीचे दर ३ हजार रूपयांनी घसरले आहेत. तुर या पिकाला शासनाचा ७ हजार ५५० असा हमी भाव आहे. लातूरच्या आडत बाजरात हमीभावाच्या जवळपास दररोज व्यवहार होत असल्याने फारसे शेतकरी हमीभाव केंद्रावर तुरीच्या नोंदणीकडे वळण्याची शक्यता कमी आहे. सोयाबीनचे भाव बाजारात कमालीचे घसरल्याने हमीभावाकडे शेतक-यांचा सर्वाधिक ओढा होता. मात्र तशी स्थिती तुरीच्या संदर्भाने दिसून येत नाही. असे असले तरी नाफेडने लातूर जिल्हयात १६ हमीभाव केंद्र तुरीच्या नोंदणीसाठी सुरू केले आहेत. या केंद्रावर शेतक-यांना नोंदणीसाठी ३० दिवसाचा कालावधी दिला आहे.