नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील शेतक-याचा हरभरा विक्रीसाठी बाजारात येण्यापूर्वीच केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियातून २६२५५.८५० मे. टन हरभरा आयात केला आहे. ११ फेब्रुवारी रोजी मुंद्रा बंदरावर ऑस्ट्रेलियन जहाज दाखल होत आहे. त्यामुळे पुढील काळात हरभ-याचे दर दबावात राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कमीत कमी ४ हजार ८२५ रुपये तर सरासरी ७ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटलला दर मिळतो आहे.
यंदा ऑस्ट्रेलियात हरभ-याचे चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे भारतीय बाजारात कमी दरातील हरभरा खरेदीवर व्यापा-यांनी भर दिला आहे. म्हणूनच देशांमध्ये येत्या काळातील हरभ-याचे दर दबावात राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. रब्बी हंगामातील हरभरा येण्यास अजून काही दिवसांचा कालावधी आहे. अशातच ऑस्ट्रेलियातून २६२५५.८५० मे.टन हरभरा आयात केला आहे. पुढील दोन दिवसांत आयात केलेला हरभरा भारतात दाखल होणार आहे.
दुसरीकडे पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हरभरा उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ साठी हरभ-याची किमान आधारभूत किंमत ५४.४० रुपये प्रति क्विंटल आहे. मागील आठवड्याच्या तुलतेन राष्ट्रीय पातळीवर हरभ-याच्या आवकेमध्ये २८.५९%वाढ झालेली दिसून येत आहे.
या आठवड्यातील लातूर बाजारपेठेमधील हरभ-याच्या किंमती मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात लातूर बाजारात हरभ-याला प्रति क्विंटल ५ हजार ५५६ रुपये, अमरावती बाजारात ६ हजार ८४ रुपये, हिंगणघाट बाजारात ५ हजार ४३९ रुपये, खामगाव बाजारात ५ हजार १०९ रुपये, उदगीर बाजारात ५ हजार ५५६ रुपये दर मिळाला.