लातूर : प्रतिनिधी
शहराच्या पुर्वभागातील गरुड चौक परिसरातील हरिओम प्लायवुड सॉ मीलला दि. २३ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपुर्ण हरिओम प्लायवुड सॉ मील जळून खाक झाले. लाखोंचे नुकसान झाले. आगीचे कारण मात्र अद्यापही समोर आलेले नाही.
या आगीच्या संदर्भाने लातूर शहर महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी गणेश चौधरी यांनी सांगीतले की, हरिओम प्लायवुड सॉ मीलला बुधवारी पहाटे ३ वाजता आग लागली. पहाटे ३.३१ वाजता अग्निशमन दलास कॉल आला. केवळ १५ मिनीटात अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. पहिल्यांना केवळ दोन गाड्या पाठविण्यात आलेली होती. परंतु, आग एवढी भीषण होती की, नंतर ६ गाड्या पाचारण करण्यात आल्या. प्लायवुड आणि लाकडं असल्यामुळे आग भीषण होती. त्यामुळे सलग दोन ते अडीच तास पाण्याचा मारा करावा लागला. आग आटोक्यात आणल्यानंतर कुलींगची प्रक्रियाही खुप उशिरापर्यंत चालली. वाढत्या तापमानामुळे एखादा छोट्याशा ठिणगीचेही भीषण आगीत रुपांतर होते आहे. हरिओम प्लायवुड सॉ मीलला लागलेल्या आगीची वेळ भलेही पहाटेची असली तरी उष्णतेची धग होतीच. त्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. जवळपास २५ ते ३० जवानांनी अथक परिश्रमाणे ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण आणि आगीत झालेल्या नुकसानीचा अद्यापही अंदाज नसल्याचे गणेश चौधरी म्हणाले.