19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रहरिनामाच्या गजराने पंढरीनगरी दुमदुमली

हरिनामाच्या गजराने पंढरीनगरी दुमदुमली

कार्तिकी एकादशी सोहळ्याला पाच लाख भाविकांची उपस्थिती

पंढरपूर : प्रतिनिधी
विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीत दाखल झालेल्या सुमारे पाच लाख भाविकांच्या हरिनामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. कार्तिकी एकादशीला चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली होती.

मंगळवारी (ता. १२) श्री विठ्ठल दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली होती. तर श्रींच्या दर्शनासाठी १६ ते १८ तासांचा अवधी लागत होता. कार्तिकी एकादशीला चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली होती. नदीत स्नानाची पर्वणी साधल्यानंतर बहुतांश भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पत्रा शेड दर्शन येथे उभे होते. तर दिंडीतील वारकरी नगरप्रदक्षिणेला निघाले होते.

कपाळी अष्टगंध, बुक्का याचा टिळा, मुखी पुंडलिक वरदा हा घोष, खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका व हाती टाळ-मृदंग हा परिवेश धारण करून नगर प्रदक्षिणेला निघालेल्या दिंडीतील भाविकांच्या जयघोषाने पंढरीतील वातावरण भक्तीमय झाले होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागा नदीचे वाळवंट भाविकांच्या अथांग गर्दीने फुलून गेले होते.

श्री विठ्ठल मंदिर सभोवतालच्या परिसरामध्ये होणा-या भाविकांच्या अलोट गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने यंदा प्रथमच बेरिकेडिंग करण्यात आले होते. श्री संत नामदेव पायरी व पश्चिम द्वार परिसरामध्ये इंग्रजी व्ही. आकाराचे बेरिकेडिंग केल्यामुळे गर्दीचे विभाजन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे भाविकांना श्री विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन व मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करणे सुलभ झाले होते.

श्री विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट
कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होते. ‘विठ्ठल आमचे जीवन’ या थीमवर आधारित मंदिराला केलेली सजावट व फुलांच्या सजावटीमध्ये तयार केलेली श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा पाहून भाविक आनंदित झालेले दिसून आले. पुणे येथील भक्त राम जांभूळकर यांनी विठुरायाच्या गाभा-याला आकर्षक फुलांची सजावट केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR