पुणे : प्रतिनिधी
इंदापूर मतदारसंघातील भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास शरद पवारांच्या पक्षाची तुतारी फुंकतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. अशातच या मुद्यावरून इंदापुरातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. आयात उमेदवाराला संधी देऊ नका, अशी मागणी त्यांनी यावेळी केल्याची माहिती आहे.
दरम्यान, येणा-या विधानसभा निवडणुका पाहता राज्यात राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची इंदापुरात जोरदार चर्चा सुरू आहे, त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी कार्यकर्त्यांसह शरद पवारांची भेट घेतली.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दशरथ माने यांनी तुम्ही द्याल तो उमेदवार निवडून येईल, आपण चुकीचा निर्णय घेऊ नका अशी विनंती यावेळी केली. तर आप्पासाहेब जगदाळे यांनी सहा जण उमेदवार आहेत कुणालाही उमेदवारी द्या, ज्यांनी ज्यांनी ताईंना विरोध केला आहे त्यांना आम्ही घरी बसवू असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.