नवी दिल्ली : प्रतिनिधी
अधिका-यांच्या मते, तिन्ही दलांनी मिळून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारताने अनेक उड्डाणे दुपारी १२ वाजेपर्यंत रद्द केली आहेत.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. यात २६ पर्यटकांचा जीव गेला होता. यानंतर भारताने अनेक निर्णय घेतले. मंगळवारी रात्री उशिरा भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.
पाकिस्तानात १०० कि.मी. आत घुसून हे ऑपरेशन करण्यात आले. भारतीय हवाई दलातील पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या नऊ तळांवर हवाई हल्ले केले. नऊ टार्गेट ठेवण्यात आले होते. नऊच्या नऊ टार्गेट यशस्वी झाले आहेत. भारताने अनेक उड्डाणे दुपारी १२ वाजेपर्यंत रद्द केली आहेत.
एअर इंडियाने एक अॅडवायजरी जारी केली आहे की, ‘सद्य परिस्थिती लक्षात घेता, एअर इंडियाने पुढील आदेश येईपर्यंत ७ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदिगड आणि राजकोट येथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. अमृतसरला जाणारी दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे दिल्लीला पाठवली जात असल्याचे विमान कंपनीने सांगितले. या अनपेक्षित व्यत्ययामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
‘इंडिगो’ने जारी केला सल्लागार
इंडिगोने त्यांच्या प्रवाशांसाठी एक सल्लागार जारी केला आहे आणि प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी विमानाबाबत माहिती गोळा करण्याचे आवाहन केले आहे. इंडिगोने एक सल्लागार जारी करत ट्विटरवर लिहिले की, ‘या भागातील बदलत्या हवाई परिस्थितीमुळे, श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदिगड आणि धर्मशाळेला जाणा-या आणि येणा-या आमच्या विमानांवर परिणाम झाला आहे. सध्या सुरू असलेल्या हवाई निर्बंधांमुळे बिकानेरला जाणा-या आणि येणा-या विमानांवरही परिणाम होत आहे.
पाकिस्ताननेही अनेक उड्डाणे रद्द केली
पाकिस्तानात झालेल्या हवाई हल्ल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्ताने देखील इस्लामाबाद आणि लाहोर विमानतळांवर जाणारी सर्व उड्डाणे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहेत. अलिकडची सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.