27.8 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रहसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले

हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मंगळवारी (दि. ४) द्यावा लागला होता. तर दुसरीकडे, पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरूच आहे. असे असताना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले आहे. याचे कारणही त्यांनी दिले आहे.

राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानुसार, कोल्हापूरचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे गेले आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे हा पदभार आहे. त्यामुळे आबिटकरांच्या निवडीवर मुश्रीफांची नव्हे, तर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचीही नाराजी लपून राहिली नाही. हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरपासून थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. २६ जानेवारीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुश्रीफ वाशिमला पोहोचले. मात्र, शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडताच कोणतीही बैठक न घेता त्यांनी थेट पुन्हा कोल्हापूर गाठले होते.

वाशिम जिल्ह्याला लागलेला ‘झेंडा टू झेंडा’ पालकमंत्री हा डाग पुसू आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा दिली जाईल, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले होते. मात्र, त्यांची घोषणा फक्त घोषणाच राहिली आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराजी
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी संधी न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांची नाराजीही लपून राहिलेली नाही. २६ जानेवारीला ध्वजारोहण करून आल्यानंतर वाशिमकडे फिरकून परत न गेलेल्या हसन मुश्रीफ यांनी आता जबाबदारी सोडली आहे.

काय दिले राजीनाम्याचे कारण?
मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्याने ८०० कि.मी.चा प्रवास करणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्रिपद सोडल्याची माहिती सध्या दिली जात आहे. त्यामुळे आता वाशिम जिल्ह्याला लवकरच नवीन पालकमंत्री मिळणार आहेत. सध्यातरी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवला जाणार असल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR