निलंगा : लक्ष्मण पाटील
सततच्या मुसळधार पावसाने दररोज प्रकल्पात आलेल्या पाण्याचा कॅनलमधून विसर्ग सुरू होता मात्र मागच्या दोन तीन दिवसापासून पाण्याची आवक वाढून प्रकल्प ९० टक्क्यांपर्यंत भरत आला. येणारी आवक जास्त अन साुंडव्यामधूनचा विसर्ग कमी होत असल्याने पाण्याच्या दाबामुळे पाळूच्या भेगा वाढत चालल्या असून प्रकल्प फुटीच्या उंबरवठ्यावर आल्याने हाडगा, सिंदीजवळगा, वडगाव, शिवणी कोतल येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती पाणी वापर संस्थेचे चेअरमन योगेश्वर वाघमारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना देताच त्यांनी प्रकल्पाला भेट देऊन तात्काळ जेसीबीच्या साह्याने सांडव्यामध्ये चर खोदून पाण्याचा विसर्ग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यंदाही प्रकल्पाची दुरुस्ती झाली नसल्याने संपुर्ण पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याने रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे प्रकल्पाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.