लातूर : प्रतिनिधी
नांदेड परिक्षेत्रात हातभट्टी अड्डयांस अवैध देशी, विदेशी दारु विक्री करणा-यांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात छापेमारी केली. एकुण १६६ गुन्हे दाखल करुन ९ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणा-यांचे धाबे दणाणले आहे.
नांदेड परिक्षेत्र अंतर्गत येणारे लातूर, परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप-महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सर्व पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे अचानकपणे लातूर जिल्ह्यातील लपून-छपून हातभट्टी तयार करणा-या ठिकाणावर जोरदार कारवाई करत लातूर जिल्ह्यात ५० व्यक्त्ती विरोधात ५० गुन्हे दाखल करुन १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून सदर मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या सहित ३१ पोलीस अधिकारी व १४३ पोलीस अंमलदारांनी सहभाग नोंदविला होता.
तर उर्वरित नांदेड, परभणी व हिंगोलीमध्येही मोठ्या प्रमाणात हातभट्टी तयार करणा-या व विक्री करणा-या तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणा-यावर कार्यवाही करण्यात आली असून संपूर्ण परिक्षेत्र स्तरावर अवैध दारू विक्री व्यवसाय करणा-या विरुद्ध एकूण १६६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९ लाख ८१ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.तसेच देशी-विदेशी दारुचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातच नव्हे तर नांदेड परिक्षेत्रातील परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतही अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. अवैध दारु विक्रीपासून ते हातभट्टी बनविण्यापर्यंच्या धंद्यांचा यात समावेश आहे. या धंद्यात मोठी यंत्रणा कार्यरत असून मोठी आर्थिक उलाढालही आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंद्यांविरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम सुरु केल्याने अवैध धंदे करा-यांचे धाबे दणाणले आहे.