पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढी पाडवा हा सण रविवारी (दि. ३०) आहे. या दिवशी आवर्जून हापूस आंब्याचा आस्वाद घेतला जातो. मात्र, यावर्षी वातावरणातील बदलामुळे नेहमीच्या तुलनेत अवघा ३० ते ४० टक्के माल मार्केटयार्डातील फळ बाजारात येत आहे. त्यामुळे भाव वाढले असून, सध्यातरी आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर दिसत आहे. मागील वर्षी ५०० ते ७०० रुपये डझन असा भाव मिळणा-या आंब्याला आता १५०० ते १८०० रुपये मोजावे लागत आहेत.
कोकणातून मागील वर्षी पाडव्याच्या वेळी दररोज ५ ते ६ हजार पेट्यांची आवक होत होती. ती आता १ ते २ हजार पेट्यांपर्यंत कमी होत आहे. लांबलेला पाऊस, कमी पडलेली थंडी आणि आता वाढलेल्या तापमानामुळे आंब्याचा पहिला मोहोर गळाला आहे. परिणामी, उत्पादन घटल्याने आवक कमी होत आहे. त्यातच पाडव्यामुळे पुढील ४ ते ५ दिवस मागणी जास्त असणार आहे. सध्या आंब्याची कमी आवक होत आहे. १० एप्रिल ते १० मे या कालावधीत आवक वाढेल. त्यावेळी भावात घट होण्याची शक्यता आहे.