मुंबई : वृत्तसंस्था
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या गाजलेल्या संगीतामुळे प्रचंड लोकप्रिय झालेल्या हिमेश रेशमिया यांना मराठी प्रेक्षक आता एका वेगळ्या भूमिकेत पाहणार आहेत. आतापर्यंत त्यांनी दिलेली हिट गाणी, टीव्हीवरील उपस्थिती आणि परफॉर्मन्सेसमुळे त्यांची स्वत:ची एक खास ओळख तयार झाली आहे.
पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी म्युझिक प्रेझेंटर म्हणून काम करताना ते अतिशय उत्सुक असून, मराठी प्रेक्षकांकडूनही त्यांना तितकाच छान प्रतिसाद मिळेल, अशी त्यांची खात्री आहे. हिमेश रेशमिया मेलोडीज लेबलच्या माध्यमातून त्यांनी ‘नाच मोरा…’ हे गाणे सादर केले असून, हे त्यांच्या मराठी संगीत प्रवासाची दमदार सुरुवात ठरणार आहे.
हिमेश रेशमियानं सोशल मीडियावर या गाण्याबद्दल भावना व्यक्त करताना लिहिले आहे की, ‘मी एक भन्नाट गाणे घेऊन आलोय… तयार आहात ना? माझ्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या या गाण्याला तुम्ही मनापासून प्रेम द्याल, याची खात्री आहे.’
श्रेय पिक्चर कंपनी निर्मित आणि नम्रता सिन्हा प्रस्तुत ‘सकाळ तर होऊ द्या’ या बहुचर्चित चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या चित्रपटाद्वारे हिंदी मालिकांतून आणि वेबसीरिजमधून मोठा अनुभव घेतलेली नम्रता सिन्हा मराठीत पदार्पण करत आहेत. दिग्दर्शक आलोक जैन यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, तेही मराठीत पहिल्यांदाच वेगळा प्रयोग करत आहेत. या गाण्याद्वारे अभिनेता सुबोध भावेचा एक हटके लुक प्रेक्षकांसमोर आला आहे.