अहिल्यानगर : प्रतिनिधी
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे भाजपशी बंडखोरी करत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात त्यांनी शिवसेना (यूबीटी) पक्षाचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे यांना आव्हान उभे केले आहे.
बच्चू कडू यांनी नेवाशात घेतलेल्या सभेत महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. राज्यात सरकार कोणाचेही असो, पण ‘हुकूमत प्रहारची चालेल’, असा इशारा बच्चू कडू यांनी दिली. छत्रपती संभाजीराजे, बच्च कडू आणि राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी राज्यात निवडणुकीच्या मैदानात आहे. ही तिसरी आघाडी निवडणुकीत काय करिष्मा करते, याकडे लक्ष लागले आहे.
बच्चू कडू म्हणाले, आम्ही सत्तेत असो किंवा नसो, पण ‘हुकूमत’ आमचीच असते. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे उदाहरण दिले. देवेगौडा यांच्याप्रमाणे उमेदवार कमी निवडून आले, तरी ‘हुकूमत’ त्यांचीच होती. तशीच यावेळी ‘हुकूमत’ आमचीच असणार आहे.
शिवसेना (यूबीटी) पक्षाचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांच्यावर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, गडाख यांना ज्या ‘बॅट’ने निवडून आणले, तीच ‘प्रहार’ची ‘बॅट’ गडाखांना गायब करेल. शेतमालाला कमी भाव देणा-या आणि शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार करणा-यांचा यावेळी पराभव निश्चित आहे.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शंकरराव गडाख यांना आव्हान देत, शेतक-यांचे प्रतिटन कमी केलेले पाचशे रुपये देणार असल्याचे जाहीर करावे, असे आव्हान दिले. गडाख यांनी मंत्रिपदाचा वापर जिरवाजिरवीसाठी केला. आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय घेतल्याचा आरोपही केला.