धाराशिव : प्रतिनिधी
पंजाब सरकारने अतिवृष्टीमुळे हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. त्याच धरतीवर अशीच मदत महाराष्ट्र सरकारने धाराशिव भागातील शेतक-यांसाठी जाहीर करावी, तसेच शेतक-यांचे सरसकट कर्ज माफ करावे अशा अशायाचे निवेदन धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. या वेळी त्यांच्यासोबत आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्या समवेत धाराशिव लोकसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकरी होते.
२४ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागातील पाहणी दौ-यावर आहेत. धाराशिव लोकसभा मतदार संघात ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतक-यांसाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या नुकसानीची पाहणी करून त्वरित ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.
प्रमुख मागण्या:
ओला दुष्काळ: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.
* संपूर्ण कर्जमाफी: नुकसानग्रस्त शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.
* पीक विमा निकष: प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील जाचक अटी रद्द करून जुने निकष पुन्हा लागू करावेत, जेणेकरून शेतक-यांना विम्याचा लाभ मिळू शकेल.
* मदतीचे स्वरूप: मिरज आणि कोल्हापूर येथे पूरस्थितीनंतर जशी मदत देण्यात आली होती, त्याच धर्तीवर या भागातील शेतक-यांना मदत करावी.
* पायाभूत सुविधांची दुरुस्ती: अतिवृष्टीमुळे वाहून गेलेले रस्ते, पूल, बंधारे आणि वीज वितरण कंपनीचे रोहित्र व खांब दुरुस्त करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवावा.
* जमीन खरवडलेल्या शेतक-यांना मदत: ज्या शेतक-यांची जमीन खरवडून गेली आहे, त्यात बहुभूधारक शेतक-यांचाही समावेश करून त्यांना मदत द्यावी.
* पशुधन नुकसान भरपाई: पुरात वाहून गेलेल्या पशुधनाची बाजारभावानुसार मालकांना भरपाई देण्यात यावी.
* घर आणि गोठ्यांसाठी मदत: ज्यांची घरे आणि जनावरांचे गोठे पडले आहेत, त्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी.
* हेक्टरी ५० हजारांची मदत: पंजाब सरकारने जाहीर केल्याप्रमाणे, महाराष्ट्र सरकारनेही शेतक-यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी.

