नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघात प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. तीन वर्षानंतर आलेल्या या अहवालात मानवी चूक असल्याचे म्हटले आहे. जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर ११ जणांचा या अपघातात मृत्यू झाला होता. ही दुर्घटना पायलटच्या चुकीमुळे झाल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या अहवालात म्हटले आहे. ८ डिसेंबर २०२१ रोजी तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हा अपघात झाला होता.
संसदेत संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीचा अहवाल मांडण्यात आला. या अहवालात एमआय-१७ व्ही५ हेलिकॉप्टर दुर्घटना एयर क्रू म्हणजे पायलटच्या चुकीमुळे झाल्याचे म्हटले आहे.
समितीने आपल्या आधीच्या अहवालात म्हटले की, डोंगरांमधील वातावरण अचानक बदलले. त्यानंतर हेलिकॉप्टर ढगांमध्ये गेले. त्यामुळे पायलटला दिशेचा अंदाज आला नाही. त्यामुळे ‘कंट्रोल्ड फ्लाइट इन टू टेरेन’ झाले. दुस-या शब्दांत असे म्हणता येईल की, पायलटला हेलिकॉप्टर जमिनीवर आदळणार असल्याचे समजले नाही. तपासणी पथकाने फ्लाइट डेटा रिकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचे विश्लेषण केले. आता सर्व साक्षीदारांची तपासणी केल्यानंतर दुर्घटनेच्या कारणांची माहिती मिळाली आहे.
८ डिसेंबर २०२१ रोजी जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह १२ सशस्त्र दलाचे कर्मचारी हेलिकॉप्टरमधून जात होते. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील सुलूर हवाई दल तळावरून ते संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाकडे जात होते. त्यांना घेऊन एमआय-१७ व्ही५ हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले. या अपघातात सीडीएस जनरल रावत, त्यांची पत्नी आणि अन्य ११ जणांचा मृत्यू झाला होता. शौर्य चक्र विजेते ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे या अपघातात बचावले होते. मात्र आठवडाभरानंतर त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.