लातूर : प्रतिनिधी
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम होईपर्यंत बहिण लाडकी होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर मात्र बहिणींची अवस्था हेलीकॉप्टर उडाले आकाशी, लाडक्या बहिणी राहिल्या उपाशी, अशी झाली.
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरील विचारपिठावर दुपारी १२.१७ वाजता राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे आगमन झाले. स्वागत समारंभ, विविध योजनांतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण, मान्यवरांचे मनोगत झाल्यानंतर दुपारी १.२३ वाजता राष्ट्रपती द्रोपदी मुर्र्मू यांच्या भाषणाला सूरुवात झाली. त्यांनी महिला सक्षमीकरणाविषयी अत्यंत प्रभावीपणे आपले मनोगत व्यक्त केले. दुपारी १.३६ वाजण्याच्या सूमारास राष्ट्रपतींचे मनोगत संपले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्व मान्यवरांचा ताफा शासकीय विश्रामगृहाकडे गेला. पोलिसांनी शासकीय विश्रामगृह ते महाराष्ट्र देवगिरी महाविद्यालयासमोरील प्रांगणातील हेलीपॅडपर्यंतचा संपूर्ण रस्ता ताब्यात घेतला. सर्वप्रकाची वाहने रोखण्यात आली. राष्ट्रपतींचा कॅन्वा गेल्याशिवाय एकही वाहन सोडले नाही. कार्यक्रमास आलेल्या सर्व लाडक्या बहिणी रस्त्याच्या दूतर्फा थांबेलल्या होत्या, काही बहिणी थकुन खाली बसल्या होत्या. पाऊसात भिजत होत्या. काही बहिणी भूक लागल्याने बिस्कुट, फरसान खात होत्या. दरम्यान सर्व मान्यवरांनी विश्रामगृहावर भोजन घेतल्यानंतर त्यांचा ताफा हेलीपॅडकडे निघाला. दुपारी ३.३८ वाजण्याच्या सुमारास मान्यवरांना घेऊन हेलीकॉप्टर आकाशी उडाले. बहिनी मात्र उपाशी राहिल्याचे चित्र कार्यक्रम स्थळी होते. हेलीकॉप्टर आकाशी उडाल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरु केली. वाहनांची पार्कींग कार्यक्रमस्थळापासून दोन-तीन किलो मीटरवर होती. लाडक्या बहिणींनी कसेबसे चालत वाहनतळ गाठून वाहनांत बसल्या आणि आपापाल्या गावी निघून गेल्या.