24.1 C
Latur
Thursday, October 9, 2025
Homeसंपादकीयहेल्मेट सक्ती

हेल्मेट सक्ती

देशातील रस्ते सुरक्षा उपाययोजनांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आदींना निर्देश दिले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०२३ मधील देशातील रस्ते अपघातांची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात रस्ते अपघातांत १,७२,८९० जणांचा मृत्यू झाला असून, हा आकडा वाढतच असल्याचे म्हटले आहे. देशभरातील अपघातांत ३५ हजारहून अधिक पादचा-यांचा मृत्यू झाला. तसेच हेल्मेटचा वापर न केल्याने ५४ हजारहून अधिक दुचाकीस्वार, प्रवाशांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी केंद्र सरकारने दिली होती. त्याची दखल घेत न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एस. राजसीकरण यांनी २०१२ मध्ये याबाबत याचिका दाखल केली होती. सुनावणी वेळी वाहनांवरील अनधिकृत लाल-निळ्या ‘फ्लॅशिंग लाईट्स’ आणि बेकायदेशीर भोंग्यांवर जप्ती, बाजारपेठेत कारवाई आणि दंड आकारून त्यांना पूर्ण बंदी घालण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच सात महिन्यांनंतर न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी ठेवण्याचे आदेश महाप्रबंधकांना दिले. न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, दुचाकीचालक आणि सहप्रवाशांना हेल्मेट वापरण्यासाठी कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करा. रस्ते मार्गावर विविध ठिकाणी बसवलेल्या कॅमे-यांच्या साह्याने यावर अंकुश ठेवा.

रस्ते मार्गिकांची (लेन) शिस्त पाळण्यासाठी उपाययोजना करा. त्यासाठी मार्गिका निश्चिती, रंगीत पट्टे आदींचा वापर करा. प्रखर एलईडी दिवे, लाल-निळे दिवे आणि बेकायदा भोंगे (सायरन) आदींवर निर्बंध घाला. हेल्मेटचा वापर, चुकीच्या मार्गिकेवरून (लेन) वाहन चालवणे, असुरक्षित ‘ओव्हरटेकिंग’ प्रखर एलईडी दिव्यांचा वापर, लाल-निळे दिवे, भोंगे (सायरन) यांची अनधिकृत विक्री आणि गैरवापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. गत वर्षभरात राज्यातील विविध महामार्ग आणि राज्यमार्गावर झालेल्या ३६ हजार ८४ अपघातांमध्ये सुमारे १५ हजार ३३५ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले तर ३० हजार ७३० प्रवासी जखमी झाले. या अपघातांवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे. दळणवळण मंत्रालय आणि सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल तसेच रस्ता सुरक्षा समित्यांच्या निरीक्षणानुसार डिसेंबर २०२४ मध्ये मोटार वाहनांची संख्या ४.८८ कोटी तर प्रति १० हजार वाहनांमागे ७ अपघात अशी नोंदवली गेली. २०१५ मध्ये हेच प्रमाण २५ होते. २०२४ मध्ये अपघातांच्या संख्येत घट करण्यात यश आले असले तरी, अद्यापही अपघातांचे प्रमाण मोठे आहे. ते कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघात रोखण्यासाठी दरवर्षी रस्ते सुरक्षा या संकल्पनेवर आधारित पथनाट्य आणि व्याख्याने आयोजित करण्यात येतात. रस्ते सुरक्षा उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी जानेवारी महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळण्यात येतो.

८० टक्के अपघात हे चालकाच्या चुकीमुळे होतात. त्यासाठी चालकांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सर्वाधिक अपघात आणि मृत्यूमागचे मुख्य कारण म्हणजे वाहनांचा अतिवेग. अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि ते अपघाताला कारणीभूत ठरते. ‘वेगावर नियंत्रण ठेवा’ असे फलक महामार्गावर लावलेले असतात. पण या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने वेगावर नियंत्रण रहात नाही आणि वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होतो. वाहन चालवताना थकवा किंवा झोप आल्याने अपघात झालेले दिसतात. विशेषत: ट्रक आणि लांब पल्ल्याचा अपघात होण्यामागचे हे एक प्रमुख कारण आहे. वाहन चालवताना थकवा किंवा झोप आल्याने चालकाचे मेंदूवरील नियंत्रण सुटते आणि रात्री -अपरात्री अपघात होतात. वाहन चालवताना मोबाईलच्या वापरामुळेही अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. परवाना नसलेले चालक वाहन चालवताना दिसतात, त्यामुळेही अपघातांना निमंत्रण मिळते. वाहन चालवताना ब्रेक, टायर, स्टेअरिंग, हेडलाईट सुस्थितीत आहेत की नाही हे पाहणेही अत्यंत महत्त्वाचे आहे.

वाहतूक शाखेकडून नियमित तपासणी होत नसल्याने अधिक भाड्याच्या हव्यासापोटी वाहनचालकांकडून ओव्हर लोडिंग केले जाते, अधिक प्रवासी आणि अधिक माल भरला जातो, त्यामुळेही अपघात होताना दिसतात. रात्रीच्यावेळी वाहन चालवताना खड्डे, अंधार, चुकीची वळणे यामुळेही अपघात होतात. वाहतूक नियमांचे पालन न करणे, रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण, अपुरे वाहतूक चिन्ह आदी गोष्टींमुळेही अपघातांना निमंत्रण दिले जाते. जोरदार पाऊस, धुके, वादळी वारे, पावसाळ्यात वाहने घसरूनही अपघात होतात. पादचारी, सायकलस्वारांचे चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडणे, जनावरे, वन्यप्राणी अचानक रस्त्यावर येणे अशा प्रकारांमुळे अपघात होतात. अपघात रोखण्यासाठी आणि अतिवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी हायवे व शहरी रस्त्यांवर स्पीड गन, कॅमेरे, ई-चलन, दारू पिऊन वाहन चालवणा-यांवर कारवाई, नियमित अल्कोहल टेस्ट, हेल्मेट, सीटबेल्ट सक्ती, दंड व जनजागृती मोहिमा राबविणे अत्यावश्यक आहे. दरवर्षी वाहनांची तांत्रिक तपासणीही केली जावी. आपत्कालीन सेवा, हेल्पलाईनचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती करणे, अपघातग्रस्तांना त्वरित रुग्णालयात नेणे, अपघात झाल्यास हायवे पेट्रोलिंग व्हॅनद्वारे तत्काळ मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सरकारने खड्डेमुक्त रस्ते अभियान राबविणे अत्यंत गरजेचे आहे. सुस्थितीतील रस्ते ही सरकारची जबाबदारी आहे. भ्रष्टाचार, अपुरी देखभाल आणि कमी दर्जाचे बांधकाम ही रस्ता समस्येची मुख्य कारणे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR