पावसामुळे सामना रद्द, दिल्ली, हैदराबाद संघाला प्रत्येकी १ गुण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नशिब किती फाटके असावे, याचा प्रत्यय सनरायझर्स हैदराबादच्या संघाला चांगलाच आला. हैदराबादचा संघ सहजपणे सामना जिंकणार होता. पण पावसाने त्यांना जोरदार धक्का दिला. कारण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे हैदराबादपासून विजय दुरावला.
या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाच्या नावावर १० लढती होत्या. या १० सामन्यांपैकी दिल्लीच्या संघाने सहा सामने जिंकले होते, तर त्यांना चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. दिल्लीने सहा विजय मिळवले होते, त्यामुळे त्यांच्या खात्यात १२ गुण जमा झाले होते. या १२ गुणांसह त्यांनी पाचवे स्थान पटकावले होते. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा पराभव अटळ असल्याचे समजले जात होते. कारण दिल्लीच्या संघाला फक्त १३३ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे दिल्लीचा संघ पराभूत झाला असता तर त्यांना पाचव्याच स्थानावर राहावे लागले असते. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी समान एक गुण देण्यात आला. त्यामुळे आता दिल्लीच्या खात्यात १३ गुण झाले आहेत. पराभूत होण्यापेक्षा एक गुण मिळणे दिल्लीच्या संघासाठी नक्कीच फायदेशीर आहे. पण या सामन्यानंतर हैदराबादच्या संघाचाही फायदा झाल्याचे पाहायला मिळाले.
हैदराबादच्या संघाने या सामन्यापूर्वी १० सामने खेळले होते. या १० सामन्यांमध्ये हैदराबादला फक्त तीनच सामने जिंकता आले होते, तर सात लढतींमध्ये त्यांचा पराभव झाला होता. हा सामना हैदराबादचा संघ निश्चित जिंकेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण पावसाने हैदराबादला धक्का दिला आणि सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे हैदराबादच्या संघाला एक गुण मिळाला आहे. या सामन्यापूर्वी हैदराबादच्या संघाने फक्त सहा गुण होते आणि ते नवव्या स्थानावर होते. पण या सामन्यात त्यांना एक गुण मिळाला आणि त्यांचे सात गुण झाले. सात गुणांसह आता हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे.