28.8 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeअंतरराष्ट्रीयहॉकिंग यांच्या सूक्ष्म कृष्ण विवरांच्या संकल्पनेला पुष्टी

हॉकिंग यांच्या सूक्ष्म कृष्ण विवरांच्या संकल्पनेला पुष्टी

लंडन : वृत्तसंस्था
प्रसिद्ध दिवंगत भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी पाच दशकांपूर्वी अशी संकल्पना मांडली होती की, बिग बँगच्या वेळी संपूर्ण ब्रह्मांड सूक्ष्म कृष्णविवरांनी भरले गेले असावे. आता वैज्ञानिकांना असे संकेत मिळाले आहेत की, अशा एका सूक्ष्म कृष्णविवराचा स्फोट प्रत्यक्ष घडला असावा. फेब्रुवारी २०२५ मध्ये, युरोपियन संशोधन संस्थेने (जी फ्रान्स, इटली आणि ग्रीसच्या किना-यावरील समुद्राच्या तळाशी असलेल्या डिटेक्टरसह कार्यरत आहे) अत्यंत प्रबळ न्युट्रिनो कणाच्या शोधाची घोषणा केली. या रहस्यमय कणाची ऊर्जा सुमारे १०० पीइव्ही इतकी होती, जी जगातील सर्वात शक्तिशाली ‘लार्ज हेड्रॉन कॉलिडर’मध्ये निर्माण होणा-या कणांपेक्षा २५ पट जास्त आहे.

हा न्युट्रिनो इतका ऊर्जायुक्त का आहे, याचे उत्तर वैज्ञानिकांना सापडत नव्हते. मात्र, नवीन संशोधनात एका वेगळ्या शक्यतेचा अंदाज मांडण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, हा न्युट्रिनो एका बाष्पीभूत होणा-या कृष्णविवराचेच चिन्ह असू शकते! त्याचे समकक्ष पुनरावलोकन बाकी आहे.

१९७० च्या दशकात स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवरांबद्दल एक क्रांतिकारी संकल्पना मांडली. त्यांनी सांगितले की कृष्णविवरे संपूर्णत: काळी नसतात. कृष्णविवर हळूहळू विकिरण उत्सर्जित करते, ज्याला हॉकिंग रेडिएशन म्हटले जाते. यामुळे ते बाष्पीभूत होते आणि शेवटी उच्च-ऊर्जायुक्त कण व विकिरणांच्या वादळासारख्या स्फोटात नष्ट होते.

न्युट्रिनो हा अशाच एका स्फोटाचा पुरावा असू शकतो! सध्या ज्ञात असलेली सर्व कृष्णविवरे कमीत कमी सूर्याच्या दुप्पट वस्तुमानाइतकी मोठी आहेत आणि ती नष्ट होण्यासाठी कैक वर्षांपेक्षा जास्त काळ लागेल. न्युट्रिनो एखाद्या स्फोट झालेल्या कृष्णविवरामुळे निर्माण झाला असेल, तर ते कृष्णविवर अत्यंत छोटे असले पाहिजे. न्युट्रिनो प्रत्यक्षात एका बाष्पीभूत होत असलेल्या कृष्णविवराचा पुरावा असेल, तर हॉकिंग यांच्या सिध्दांताला प्रथमच प्रत्यक्ष पुरावा मिळू शकतो. हे संपूर्ण ब्रह्मांडशास्त्र आणि भौतिकशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल आणि कृष्णविवरांच्या अभ्यासाला नवे दालन खुले करेल!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR