लातूर : प्रतिनिधी
येथील खोरीगल्लीतील हॉटेल गरम मसालाला दि. १७ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. काही क्षणात आगीने संपूर्ण इमारत व्यापून टाकली. दरम्यान हॉटेलचे शेजारी, अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ रेस्क्यू करुन याच हॉटेलच्या वरच्या मजल्यावर राहणारे घावटी कुटूंबियातील पाच ते सहा जणांचे प्राण वाचवले.
शहरातील खोरीगल्लीत गफार घावटी यांचे गरम मसाला या नावाने हॉटेल आहे. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधुन धुर निघत असल्याचे शेजा-यांच्या लक्षात आले. हा प्रकार आगीचा असल्याचे लक्षात येतातच त्यांनी तत्काळ इतरांना मदतीसाठी हाक दिली. अग्निशाक दलास पाचाराण करण्यात आले. तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत परिसरातील शेजारी व अग्निशामक दलाच्या जवानांनी पहिल्यांदा हॉटेलच्या शेवटच्या मजल्यावर राहात असलेले घावटे परिवारातील पाच ते सहा जणांना अगोदर बाहेर काढले.
हॉटेलची संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात होती. शेजारी व अग्निशामक दलाच्या जवानांनी शिडी आणून इमारतीची पाठीमागणी बाजू व समोरच्या बाजूने घावटी परिवारातील सदस्यांना सुखरुप बाहेर काढले. यादरम्यान संपूर्ण हॉटेल आगीच्या भक्षस्थानी सापडले होते. आग हॉटेलच्या तळघराला लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील खिडक्यांच्या काचा फोडल्याने आतील धुर बाहेर पडला.