24.1 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeलातूरहोय, तुम्ही सीपीआरद्वारे जीवदान देऊ शकता

होय, तुम्ही सीपीआरद्वारे जीवदान देऊ शकता

लातूर : प्रतिनिधी
येथील शाहू महाविद्यालयातील एनसीसी (मुली व मुले) विभागाच्या वतीने सीपीआर कार्यशाळा संपन्न झाली. एमआयटी कॉलेज, लातूर येथे प्राध्यापक असलेले सीपीआर प्रशिक्षक डॉ. हमीद चौधरी यांनी एनसीसी छात्रांना सीपाआरचे प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती घेऊ शकते. सीपीआर म्हणजे काय? सीपीआर कोणाला द्यायचा? सीपीआर केव्हा द्यायचा? एखाद्याला सीपीआरची आवश्यकता आहे, हे कसे ओळखाचे? हे प्रशिक्षण डॉ. चौधरी यांनी प्रात्यक्षिकासह दिले.
भारतात दरवर्षी पन्नास टक्के लोकांचे मृत्यु हृदयविकाराने होतात. आपल्या देशात दर मिनिटाला चार व्यक्तींचा मृत्यु हृदयविकाराने होतो. त्यामुळे हे रोखण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांनीदेखील अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतले पाहिजे, असे डॉ. चौधरी म्हणाले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे म्हणाले, सीपीआर ही एक इमरजंसी लाइफ सेव्हर प्रक्रिया असून आपल्याजवळ कोणतेही साहित्य नसताना फक्त हातांनी सीपीआर देऊन आपण रुग्णाचे प्राण वाचवु शकतो. एनसीसी छात्रांनी याचे प्रशिक्षण घेऊन यासंदर्भात जनजागृती करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. गव्हाणे यांनी केले.
एनसीसी विभागप्रमुख लेफ्ट. डॉ. अर्चना टाक म्हणाल्या, आपण हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला उपचार देणारे डॉक्टर जरी नसलो तरी अशा रुग्णाला डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत हृदय सुरू राहण्यासाठी व मेंदूला काही क्षति पोहोचू नये यासाठी सीपीआरच्या रूपात प्राथमिक उपचार देऊ शकतो, त्यादृष्टीने हे प्रशिक्षण महत्वाचे आहे. लेफ्ट. डॉ. महेश वावरे यांनी सांगितले की, एखाद्या रुग्णाला ज्या क्षणाला हृदयविकाराचा झटका येतो तिथुन पुढे केवळ चारच मिनिटांनंतर त्याच्या मेंदूस क्षति पोहोचण्यास सुरुवात होते आणि पुढील पाच मिनिटांनी मेंदू पूर्णपणे बंद पडतो. त्यामुळे सीपीआरच्या या प्रक्रियेत वेळेला देखील फार महत्व देणे गरजेचे आहे. उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, डॉ. अभिजित यादव, डॉ. ऋषिकेश खरोळकर, डॉ. स्वाती फेरे, प्राची मोरे व समर्थ काळे हे यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. खरोळकर यांच्याद्वारे सर्व एनसीसी छात्रांची आयुष्मान भारत (आभा) साठी नोंदणी करून घेण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR