37.9 C
Latur
Sunday, March 30, 2025
Homeमहाराष्ट्रहोय, संतोष देशमुखांना आम्हीच संपवलं

होय, संतोष देशमुखांना आम्हीच संपवलं

सुदर्शन घुलेचा कबुलीजबाब

बीड : प्रतिनिधी
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची बुधवारी (ता. २६ मार्च) सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिकच्या तीन चेल्यांकडून आम्हीच खून केल्याची कबुली देण्यात आली आहे. आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याने आता वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची बुधवारी (ता. २६ मार्च) सुनावणी पार पडली. कराडच्या तीन चेल्यांची म्हणजेच आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून तिघांनीही आपणच सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या सुदर्शन घुले याने पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचेही सांगण्यात येत आहे. सुदर्शन घुले हा सुरुवातीला या हत्याप्रकरणात आपला सहभाग असल्याचे नाकारत होता. मात्र, पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हीडीओ दाखवल्यानंतर त्याने पटापट या संदर्भातील माहिती दिली. सुदर्शन घुले याने, ‘होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला’, अशी कबुली पोलिसांना दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख याने आम्हाला मारहाण केली. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. यानंतर या मारहाणीचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते. याचा राग आमच्या मनात होता. तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता. त्यामुळे आम्ही २९ डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली. त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटे याच्यासोबत बैठक केली, अशी कबुली सुदर्शन घुलेकडून देण्यात आली.

आरोपी महेश केदार यानेही संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हीडीओ शूट केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर जयराम चाटे यानेही त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत. तर हे आरोप आता आकाच्या तिन्ही चेल्यांकडून मान्य करण्यात आल्याने वाल्मिक कराडच्या संकटात वाढ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला हा सरकारी वकील उज्ज्वल निकम लढवत असल्याने ते आरोपींविरोधात जोरदार युक्तिवाद करत आहेत. निकम यांनी बुधवारी पहिल्यांदा युक्तिवाद केला. यावेळी उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर सादर केला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याला तीनवेळा फोन केले होते. याचा सीडीआर रिपोर्ट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर मांडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR