28.4 C
Latur
Sunday, May 18, 2025
Homeराष्ट्रीय१०० कि. मी. घुसून पाकिस्तानला मारले

१०० कि. मी. घुसून पाकिस्तानला मारले

अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही
गांधीनगर : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना भारताच्या सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानच्या हवाई तळांवर तुफानी हल्ला चढवत जबर नुकसान केले. एवढेच नव्हे तर भारताने १०० कि.मी. आत घुसून आमच्या सैन्यदलाने चोख प्रत्युत्तर दिले. आम्ही आता अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरात दौ-यावर होते. गांधीनगर येथे त्यांच्या हस्ते ७०८ कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पार पडले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकसित बनविण्यात कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही. देशाला सुरक्षित ठेवण्याचे कामही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पाकिस्तानविरोधात कारवाई करताना याची प्रचिती आली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान आमच्या सैन्यदलाने चोख प्रत्युत्तर दिले. सैन्यदलामुळे आमची मान अभिमानाने उंचावली. आता आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, असेही अमित शाह म्हणाले.

आम्ही पाकिस्तानमध्ये १०० कि.मी.पर्यंत आतमध्ये घुसून प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केले. आमची एअर डिफेन्स सिस्टिम मजबूत आहे. त्यामुळे पाकिस्तान भयभीत झालेला आहे. भारताने केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित होऊन पाहात आहे, असे अमित शाह म्हणाले.

दहशतवाद्यांचे तळ नष्ट
जेव्हा उरी येथे हल्ला झाला, तेव्हा सर्जिकल स्ट्राईक करून प्रतिकात्मक उत्तर देण्यात आले. पुलवामा येथे हल्ला झाला, तेव्हा एअर स्ट्राईक करून उत्तर देण्यात आले. मात्र, पाकिस्तानमधील दहशतवादी सुधारले नाहीत आणि त्यांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले आणि पाकमधील तळ उद्ध्वस्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR