लातूर : प्रतिनिधी
यंदाचा इयत्ता दहावीचा महाराष्ट्राचा निकाल पाहिला तर तो गत वर्षीच्या तुलनेत घसरलेला दिसून येतो. लातूर विभागाचाही निकाल सुमारे ३ टक्क्यांनी घसरला आहे, असे असले तरी १०० टक्के गुण घेणारे सर्वाधिक विद्यार्थी हे लातूर विभागीय मंडळातील आहेत. राज्यात पुन्हा लातूर पॅटर्न अग्रेसर ठरला आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ लातूरचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगीतले.
विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग इहावीच्या निकालाबाबत म्हणाले, इयत्ता दहावीचा लातूर, धाराशीव व नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर विभागाचा निकाल ९२.७७ टक्के लागला आहे. लातूर विभागातील ४४६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. लातूर जिल्ह्यातील ६८१ शाळांपैकी १२८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. धाराशीव जिल्ह्यातील ४३५ शाळांपैकी १५३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे तर नांदेड जिल्ह्यातील ७२३ शाळांपैकी १६४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. लातूर जिल्ह्यातील ६८१ शाळांपैकी २ शाळांचा निकाल ३० ते ४० टक्के, धाराशीव जिल्ह्यातील २ तर नांदेड जिल्ह्यातील ५ शाळांचा निकाल ३० ते ४० टक्के लागला आहे.
यंदा राज्यासह लातूर विभागाचाही इयत्ता दहावीचा निकाल घसरला आहे. त्याला अनेक कारणं आहेत. पेपर काठिण्य पातळी असेल किंवा आणखी काही. यंदा परिक्षाही दहा दिवस अगोदरच झाल्या होत्या. हे नैसर्गीक फ्रक्च्युवेशन आहे. लातूर विभागात परिक्षेदरम्यान केंद्रावर १३ गैर प्रकार घडले आहेत. त्याविषयी अधिका-यांकडून चौकशी करुन मंडळाच्या निमयाप्रमाणे कारवाई करण्यात आल्याचेही विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग म्हणाले.