29.7 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeलातूर१०० दिवसांच्या क्षय रुग्ण शोधमोहिमेत आढळले ८९८ क्षय रुग्ण!

१०० दिवसांच्या क्षय रुग्ण शोधमोहिमेत आढळले ८९८ क्षय रुग्ण!

लातूर : प्रतिनिधी
केंद्रीय क्षयरोग विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ७ डिसेंबर २०२४ ते दिनांक २४ मार्च २०२५ दरम्यान जिल्हयातील क्षयरोगासाठी अतिजोखीम असलेल्या निवडक कार्यक्षेत्रात १०० दिवस क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली . या मोहिमेदरम्यान १७ मार्च २०२५ अखेर जिल्हयात ८९८ क्षयरुग्णांचे निदान करण्यात आलेले आहे.
क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसीस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून याचा प्रसार श्वसनाद्वारे होतो. जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी सुमारे २५ टक्के क्षयरुग्ण हे भारतात आढळून येतात. भारतातील क्षयरुग्णांपैकी जवळपास १० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून येतात. लातूर जिल्ह्यात सन २०२४ मध्ये २९७१ क्षयरुग्ण आढळून आले आहेत. सन २०२५ राज्य क्षयरोग विभागाकडून जिल्हयास २८५० क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. जिल्ह्यामध्ये जानेवारी व २३ मार्च २०२५ दरम्यान ७०१ क्षयरुग्ण आढळले आहेत. जागतिक स्तरावरील शाश्वत विकास ध्येयानुसार सन २०३० अखेर क्षयरोगाचे दुरीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०२५ अखरे देशातून क्षयरोगाचे दुरिकरण करण्याचे महत्वकांक्षी लक्ष्य ठेवलेले आहे. त्याअनुषंगाने देशात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून दिनांक २४ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता राहुल कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने लातूर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सर्व प्रथम डॉ.रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. तांबारे एस. एन. यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना लातूर यांनी आरोग्य विभागामार्फत रुग्णांना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत जलद व दर्जेदार सेवा देत असले बाबत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात टीबीमुक्त ग्राम पंचायत अभियान राबवून जास्तीत जास्त ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त करण्याबाबत योग्य उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच क्षयरोगाचे लक्षणे असल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत जावून क्षयरोगाची तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले.
कै. वसंतराव काळे, होमिओपॅथीक महाविद्यालय येथील विद्यार्थीनींनी क्षयरोगाबाबत जनजागृतीपर पथनाटय सादर केले. या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या नर्सिग महाविद्यालय व तसेच पथनाट्य सादर केलेल्या विद्यार्थीनीना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  यावेळी उपस्थितांनी क्षयरोग दुरीकरणासाठी टिबीमुक्त भारत करण्याची शपथ घेतली. मान्यवराच्या हस्ते रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरवात झाली. रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून महात्मा गांधी चौक मार्गे परत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आल्यानंतर रॅलीचे समारोप करण्यात आले. निक्षय वाहनद्वारे शहरामध्ये जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, सहाय्यक संचालक, ढगे संजय, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ढेले प्रदिप, आयएमए अध्यक्ष डॉ.डोळे विमल, डॉ.वाघमारे व्ही.एन., अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बरुरे बालाजी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.तांबारे एस.एन., वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव बाळासाहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार आर. एच., डॉ. यादव अभिजित, वैद्यकीय अधिकारी डॉ.राऊत एच.के., वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे माधव, वैद्यकीय अधिकारी बांगर ए.आर. वैद्यकीय अधिकारी, डॉ.वाघमारे आर.एन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.कदम मनोज  व जिल्हा क्षयरोग केंद्र, लातूर येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR