22.8 C
Latur
Wednesday, September 10, 2025
Homeलातूर१०६ जोडप्यांनी समुपदेशनाद्वारे स्वीकारला सुखी संसाराचा पर्याय

१०६ जोडप्यांनी समुपदेशनाद्वारे स्वीकारला सुखी संसाराचा पर्याय

लातूर : प्रतिनिधी
कौटुंबिक हिंसाचार, किरकोळ वाद-विवाद आणि मतभेद यासह अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांत घटस्फोट घेणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लग्नानंतर पती-पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररित्या तोडण्याची प्रक्रिया म्हणजे घटस्फोट होय. घटस्फोटामुळे वैवाहिक संबंध तोडण्याचे स्वतंत्र मिळाले असले, तरी त्यामुळे अनेक बिकट समस्या देखील निर्माण होतात. यात प्रामुख्याने या दांपत्याच्या अपत्यांची हेळसांड होते. ही वाढती समस्या जर प्राथमिक स्तरावरचं सोडवली गेली, तर भविष्यात घटस्फोटांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. याच उद्देशाने पोलिसांनी काही वर्षांपूर्वी भरोसा कक्षाची स्थापना केली होती. आज या भरोसा कक्षामुळे दरवर्षी शेकडो कुटुंब आपसातले वादविवाद आणि मतभेद विसरून पुन्हा नव्याने संसारात रमले आहेत. जिल्ह्यातील १०६ जोडप्यांनी समुपदेशनाद्वारे स्वीकारला सुखी संसाराचा पर्याय.
घटस्फोटाची मुख्यत्वे कारणे पुढील प्रमाणे असून गेल्या काही वर्षांमध्ये अगदी लहान-लहान विषयांवरून काडीमोड (घटस्फोट) घेण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रेमविवाहात तर हे प्रमाण जरा जास्तचं दिसून येते. त्यामुळे घटस्फोट हा शब्द किती स्फोटक असतो, याची कल्पना घटस्फोट घेतलेल्या दाम्पत्यांना नक्की आली असेल. हल्ली तर मोबाईल, सोशल मीडिया या सारख्या विषयांना कारणीभूत धरून देखील घटस्फोट मागितले जात आहेत. याशिवाय कौटुंबिक हिंसाचार, हुंडा, मानसिक छळ, व्यसनाधीनता आणि लहान-लहान वादविवाद वरून सुद्धा घटस्फोटाचे अर्ज सादर केले जात आहेत. घटस्फोटाची वाढते प्रमाण ही आपल्या समाजासाठी एक गंभीर समस्या बनलेली आहे. त्यामुळेच पोलिसांनी अशा काही समस्यांवर प्राथमिक स्वरूपाचा तोडगा काढण्याकरिता गेल्या काही वर्षांपूर्वी भरोसा कक्षाची स्थापना केली आहे.
भरोसा कक्षाकडे दर महिन्याला साधारणत ६० ते ७० प्रकरणे तक्रार स्वरूपात येत आहेत. यामध्ये कौटुंबिक वाद-विवाद, पती-पत्नीचे भांडण आणि त्यातून निर्माण होणा-या समस्यांवर आधारित तक्रारी सर्वाधिक येतात. चालू वर्षाच्या ८ महिन्यात भरोसा कक्षाकडे ५४७ प्रकरणे दाखल झाली असून त्यापैकी ४१९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे. यामध्ये १०६ प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा कक्षाला मोठं यश प्राप्त झालेला आहे.  पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात भरोसा सेल प्रभारी अधिकारी महिला पोउपनि. श्रीमती शामल देशमुख समुपदेशन करीता पोउपनि संजय भोसले, महिला पोलिस अंमलदार मीरा सोळंके, मीना पवार यांनी मेहनत घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR