32.6 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeपरभणी१० क्विंटल खीर, हुलपल्ली महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ

१० क्विंटल खीर, हुलपल्ली महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ

पूर्णा : शहरात दरवर्षी ग्रामदैवत श्री गुरु बुद्धी स्वामी पाडवा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पवित्र यात्रेचे खास आकर्षण म्हणजे हूलपल्ली आणि गव्हाची खीर, ज्याचे धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व आहे. दि.३१ मार्च रोजी पाडव्याच्या दुस-या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी हजाराने भाविकांनी खीर व हुलपल्ली या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी रांगेत बसून भाविकांनी या महाप्रसादाचा स्वाद घेतला.

या यात्रेत नवे गहू, खसखस, खोबरे, तूप, गूळ, सोप, इलायची यापासून खीर तयार केली जाते. बेसनापासून बनवलेली हूलपल्ली यांचा महाप्रसाद तयार केला जातो. तब्बल १० क्विंटल गव्हापासून खीर तयार केली जाते, ज्याचा हजारो भाविक लाभ घेतात.

श्री गुरु बुद्धीस्वामी लासीना संस्थानतर्फे मागील अनेक वर्षांपासून ही यात्रा अखंडपणे आयोजित केली जात आहे. यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक घरातून पोळ्या दान केल्या जातात. हे देखील या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य आहे.

पूर्णा शहरासह तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात. लिंगायत समाज बांधवांसह सर्व धर्मीय भाविक यात्रेचा आनंद घेतात. महाप्रसादनंतर रात्री शहरातील मुख्य रस्त्यांवरून श्रींचा पालखी सोहळा टाळ मृदंग गजरात काढला जातो. श्रद्धेचा आणि भक्तीचा हा सोहळा संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण करतो.

श्री गुरु बुद्धीस्वामी पाडवा यात्रा महोत्सव केवळ धार्मिक यात्रा नसून, श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा उत्तम संगम आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR