शरद पवारांनी आखली रणनीती
बारामती : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून दावे- प्रतिदावे सुरू आहेत, अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मविआच्या जागावाटपाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. येत्या १० दिवसांत मविआचे जागा वाटप पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे, तसेच लोक परिवर्तनासाठी उत्सुक आहेत, असा दावाही त्यांनी केला. बारामतीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्याजिल्ह्यात इच्छुकांचा अभ्यास सुरू आहे. पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते त्यांच्या मुलाखती घेतील, त्यानंतर तीन पक्ष मिळून निर्णय होईल. त्यामध्ये आमची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना. तीन पक्षांनी मिळून निवडणुकीला सामोरे जात आहोत, त्यामुळे एखाद्या जागेवर कोणी निवडणूक लढवावी, याबाबतही एकवाक्यता असावी, अशी रणनीती आहे. गेल्या तीन दिवसांपासून यासंबंधी तिन्ही पक्षांची मुंबईमध्ये बैठक सुरू आहे, आणि जागांचे वाटप करत आहेत, येत्या १० दिवसांत हे संपवून प्रत्यक्षात लोकांच्यात जाण्याचा विचार आहे, असे शरद पवार म्हणाले.
राज्यात सात वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या, त्यावेळी काँग्रेसचा खासदार निवडून आला, राष्ट्रवादीचे चार निवडून आले, यावेळी तीस लोक निवडून आले. तसेच महाराष्ट्रात आशादायक चित्र, मविआसाठी अनुकूल वातावरण आहे. सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षाला बाजूला करण्याच्या मन:स्थितीत लोक आहेत. लोक परिवर्तन करण्यासाठी इच्छुक आहेत, त्या कामाला आम्ही लागू,असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
मराठा-ओबीसी संघर्षावर पवारांची प्रतिक्रिया
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा होत असल्याचे चित्र दिसत आहे. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सामंजस्याने यातून मार्ग काढला पाहिजे, असे सांगितले. तसेच तणाव निर्माण होण्याचे काहीही कारण नाही. कारण आपला जात, धर्म वेगळा असला तरी आपण सर्व भारतीय आहोत. महाराष्ट्राचे आपण सर्व घटक आहोत. सर्व समाजात सामंजस्य कसे राहील, याबाबतची भूमिका या विषयात जे काम करत आहेत, त्यांनी घेतली पाहिजे.